अफगाणिस्तानातील वेगवान सैन्यमाघारीमुळे अमेरिकन जवानांची सुरक्षा निश्‍चित झाली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

सुरक्षा निश्‍चित

वॉशिंग्टन – स्पीड इज सेफ्टी, अर्थात सैन्यमाघारीच्या वेगामुळे सुरक्षा निश्‍चित होत असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेताना घाई करीत आहे आणि याचे भयंकर दुष्परिणाम समोर येत असल्याचा आरोप होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची अधिकाधिक भूमी बळकावण्याचा सपाटा लावला, त्याला अमेरिकेने घाईने घेतलेली माघार जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, बायडेन यांनी अफगाणिस्तानतील माघारीबाबत ही घोषणा केली. यानुसार 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे सक्रीय सैन्य अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेणार आहे.

सैन्यमाघारीवरील आक्षेपांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या 20 वर्षात लाखो कोटी डॉलर्स या युद्धात खर्च झाले आणि 2448 अमेरिकन जवान या युद्धात मारले गेले, याची आठवण करून दिली. अफगाणिस्तानातील युद्धासाठी अमेरिकेच्या पुढच्या पिढ्यांना वेठीस धरता येणार नाही, असा दावा केला. अफगाणिस्तानची उभारणी करण्यासाठी अमेरिकेने या देशात युद्ध छेडले नव्हते. ओसामा बिन लादेनला नरकाच्या दारापाशी नेऊन ठेवणे आणि अमेरिकेवर हल्ला चढविण्याची अल कायदाची क्षमता नष्ट करणे, ही दोन उद्दिष्टे समोर ठेवून अमेरिकेने हे युद्ध केले. ते साध्य झालेले आहे, असा दावा बायडेन यांनी केला.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/rapid-withdrawal-of-troops-from-afghanistan-ensured-the-safety-of-american-troops/