- कंदहारमध्ये सलग दुसर्या दिवशी हवाई हल्ले
- अफगाणी लष्करानेे तीन जिल्ह्यांवर नियंत्रण मिळविले
- दोहा येथे अफगाण सरकार व तालिबानमध्ये चर्चा सुरू
काबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात तालिबानच्या दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत सुमारे 300 दहशतवाद्यांना ठार केले. कंदहार, तखर या प्रांतातील हवाई हल्ल्यात 81 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. त्याचबरोबर तालिबानच्या दहशतवाद्यांना पिटाळून तीन जिल्ह्यांचा अफगाणी लष्कराने पुन्हा ताबा घेतलका आहे. दरम्यान, कतारची राजधानी दोहा येथे अफगाण सरकार आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असली, तरी अफगाणिस्तानातील संघर्ष थांबलेला नाही.
अफगाणिस्तानच्या 85 टक्के भूभागावर आपण ताबा घेतल्याचा दावा तालिबानच्या वरिष्ठ नेत्याने काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात होती. येत्या काही आठवड्यांमध्ये अफगाणिस्तान तालिबानच्या पूर्ण नियंत्रणाखाली जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण काही ठिकाणी तालिबानविरोधात पिछेहाट झाली असली तरी आपले लष्कर तालिबानविरोधात चांगली कामगिरी करीत असल्याचा दावा अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रालय करीत आहे.
तालिबानच्या दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी अफगाणी लष्कराने हवाई हल्ल्यांचा जोरदार वापर केला आहे. या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या हल्ल्यांमध्ये तालिबानचे 284 दहशतवादी ठार तर 205 जखमी झाले. एकट्या जोझवान प्रांतातील हवाई हल्ल्यात 81 दहशतवाद्यांचा खातमा केला. तर शनिवारी कंदहार, तखर, बलख या प्रांतात चढविलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचे दहशतवादी मोठ्या संख्येने ठार झाल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
यापैकी पाकिस्तानच्या सीमेजवळील कंदहार प्रांतात अफगाणी लष्कराने जोरदार हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. तालिबानने ताब्यात घेतलेली येथील स्पिन बोल्दाक सीमाचौकीवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी अफगाणी लष्कराने व्यापक मोहीम छेडली आहे. अफगाणी लष्कराने स्पिन बोल्दाकमधून तालिबानला हुसकावण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हवाई हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी पाकिस्तानने दिल्याचा पर्दाफाश अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी केला.
त्यानंतर अफगाणी लष्कराने येथील कारवाईची तीव्रता वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर अफगाणी लष्कराने परवान, बामियान आणि निमरोझ या प्रांतातील तीन जिल्ह्यांचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानातील हा संघर्ष तीव्र होत असताना, कतारमध्ये अफगाण सरकार आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई तर तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्ला बरादर आणि सुहेल शाहिन सहभागी आहेत.
अफगाणिस्तानात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याच्या आपल्या मागणीवर तालिबान ठाम असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यांसाठी अफगाणिस्तानात संघर्षबंदी प्रस्थापित करण्याची तयारी तालिबानने व्यक्त केली. पण यासाठी अफगाण सरकारने आपल्या सात हजार साथीदारांची सुटका करावी, अशी तालिबानची मागणी असल्याचे अफगाणी सरकारच्या अधिकार्यांनी दोन दिवसांपूर्वी उघड केले. ही मागणी मान्य केली तर तालिबानची संघटना अधिक मजबूत होईल व या दहशतवादी संघटनेचे अफगानिस्तानातील हल्ले तीव्र होतील, अशी चिंता अफगाणी अधिकार्याने व्यक्त केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |