पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध भडकण्याचा धोका – ब्रिटनच्या लष्करी अधिकार्‍यांचा इशारा

पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध

लंडन/वॉशिंग्टन/मॉस्को – शीतयुद्धानंतर प्रथमच पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध भडकण्याचा धोका सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे, असा इशारा ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख सर जनरल निक कार्टर यांनी दिला. यापूर्वी पाश्‍चात्य देश व रशियामध्ये उपलब्ध असणारे पारंपारिक राजनैतिक पर्याय सध्या सक्रिय नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पूर्व युरोपमध्ये सध्या दोन्ही बाजूंकडून सुरू असलेली तैनाती व लष्करी हालचाली या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या अधिकार्‍यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी युरोपिय देशांना रशिया-युक्रेन युद्धाबाबत बजावले होते.

पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध

रशिया व पाश्‍चात्य देशांमधील संबंध सध्या चांगलेच चिघळले आहेत. चीनबरोबरील वाढती जवळीक, सायबरहल्ले, ऍलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावरील कारवाई, इंधनपुरवठा यासारख्या मुद्यांवरून हा तणाव निर्माण झाला आहे. त्यात सध्या युक्रेन तसेच बेलारुसमधील घटनांची भर पडली आहे. युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी व तणाव निर्माण करण्यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ ९० हजार जवान तैनात केल्याचा आरोप युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर बेलारुस व युरोपमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने बेलारुसमधील तैनातीतही वाढ केली होती.

पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध

रशियाच्या हा हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेसह नाटो सदस्य देश सक्रिय झाले आहेत. युक्रेनसह युरोपिय सदस्य देशांमधील संरक्षणसज्जता वाढविण्यात आली असून लढाऊ विमाने तसेच युद्धनौकांच्या फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे तणाव अधिकच टोकाल पोहोचल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. अशा वेळी ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. नवे पर्व हे ‘मल्टिपोलर वर्ल्ड’ अर्थात एकापेक्षा अधिक महासत्तांचा समावेश असणार्‍या जगाचे असून त्याने तणाव चिघळण्याचे धोके अधिक वाढले असल्याचे जनरल कार्टर यांनी बजावले.

‘आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही वादाच्या मुद्यांचे रुपांतर संघर्षाचा भडका उडेल अशा स्थितीत होऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. असे न झाल्यास गैरसमज व अपघातातून वादाचे रुपांतर युद्धात होऊ शकते’, असा इशारा ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला. एकाधिकारशाही असलेल्या राजवटी निर्वासितांपासून ते सायबरहल्ल्यांपर्यंत कोणत्याही घटकाचा वापर त्यांचे इरादे पूर्ण करण्यासाठी वापरु शकतात, याची जाणीवही त्यांनी करून दिली. सध्याचे युद्धतंत्र बदलले आहे, असे जनरल कार्टर म्हणाले. त्याचवेळी यापूर्वी शीतयुद्धाच्या उपलब्ध असलेल्या राजनैतिक पर्यायांप्रमाणे इतर मार्ग सध्या उपलब्ध नाहीत, असा दावाही ब्रिटनच्या लष्करी अधिकार्‍यांनी यावेळी केला. हे मार्ग उपलब्ध नसल्याने युद्धाचा भडका उडण्याची शक्यता अधिकच तीव्र होते, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info