Breaking News

इस्लामधर्मिय उघुरवंशियांवरील टेहळणीसाठी चीनने 11 लाख गुप्तहेर नेमले – अमेरिकेकडून चीनवर उघूरांच्या वंशसंहाराचा आरोप

बीजिंग/वॉशिंग्टन – चीनकडून अल्पसंख्य उघुरवंशिय इस्लामधर्मियांवर सुरू असलेली दडपशाही व अत्याचार अधिकच तीव्र झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी 11 लाख उघुरवंशियांना नजरकैदेत ठेवल्याचे उघड झाल्यानंतर आता चीनने झिंजिआंग प्रांतात राहणार्‍या उघुरवंशियांवर नजर ठेवण्यासाठी तब्बल 11 लाख गुप्तहेर तैनात केल्याचे समोर आले आहे. हे गुप्तहेर ‘हान’वंशिय सरकारी कर्मचारी व सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून त्यांना उघुरवंशिय नागरिकांच्या घरात राहून नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चीनच्या राजवटीकडून उघुर तसेच इतर वंशाच्या इस्लामधर्मियांकडे देशद्रोही म्हणून पाहण्यात येते. त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवण्यासाठी चीनने गेल्या काही वर्षांपासून झिंजिआंग व नजिकच्या भागातील लष्करी तैनाती प्रचंड वाढविली असून या भागात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणीही सुरू केली आहे. या सर्व गोष्टींसाठी चीनने सातत्याने दहशतवादविरोधी मोहीम व सुरक्षेचे कारण पुढे केले आहे. यावर टीका होत असतानाच चीनच्या सत्ताधारी राजवटीने आता वेगळ्या मार्गाने उघुरवंशियांची टेहळणी सुरू केली आहे.

उघुरवंशिय, टेहळणी, Becoming Family Week, वंशसंहार, लष्करी तैनाती, ww3, बीजिंग, वॉशिंग्टन, क्रिस्तोफर स्मिथ

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनने झिंजिआंग प्रांतात ‘बिकमिंग फॅमिली वीक’ नावाचा कार्यक्रम राबविला होता. यावेळी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना उघुरवंशियांच्या घरात एक आठवड्यासाठी पाठविण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हणजे मोठ्या मोहिमेची चाचणी असल्याचे उघड झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चीन सरकारने ‘पेअर अप अ‍ॅण्ड बिकम फॅमिली’ नावाची व्यापक मोहीम हाती घेतली.

या मोहिमेअंतर्गत जवळपास 11 लाख स्थानिक सरकारी कर्मचार्‍यांना उघुरवंशिय कुटुंबाच्या घरात जाऊन राहण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येकी दोन महिन्यानंतर पाच दिवसांसाठी सरकारी कर्मचारी उघुरवंशिय परिवारात वास्तव्य करतील, असे आदेशात सांगण्यात आले आहे. केवळ घरातच नाही तर उघुरवंशियांच्या खाजगी तसेच कौटुंबिक कार्यक्रमासह प्रार्थनास्थळांवर उपस्थित राहण्याचे निर्देशही कर्मचार्‍यांना देण्यात आले होते.

झिंजिआंगमधील उघुरवंशियांनी परदेशातील उघुरवंशिय सदस्यांबरोबर संपर्क साधल्यानंतर या गोष्टी उघड झाल्या आहेत. यातून चीन सरकार आपल्याच नागरिकांवर अत्याचार करीत असल्याची व गुन्हेगारांप्रमाणे त्यांची टेहळणी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे चीनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, अमेरिकी संसदेतील वरिष्ठ संसद सदस्य क्रिस्तोफर स्मिथ यांनी उघुरवंशियाच्या मुद्यावरून चीनवर टीकास्त्र सोडले असून चीन सरकारकडून सुरू असलेल्या कारवाया म्हणजे वंशसंहार असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मुद्दा चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील बैठकीत उपस्थित करावा, अशी मागणीही स्मिथ यांनी केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info