गेल्या दशकात अमेरिकी इंधनवाहिनींवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे चीन होता – अमेरिकी यंत्रणांचा आरोप

इंधनवाहिनींवर

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी राजवटीचे समर्थन असलेल्या हॅकर्सनी अमेरिकेतील इंधनवाहिनींवर सायबरहल्ले चढविले होते, असा दावा अमेरिकी यंत्रणांनी केला आहे. 2011 ते 2013 अशी दोन वर्षे चिनी हॅकर्सनी तब्बल 23 इंधनवाहिनी कंपन्यांना लक्ष्य केल्याचा आरोप अमेरिकी यंत्रणांनी केला आहे. सायबरहल्ल्यावरून चीनला लक्ष्य करण्याची अमेरिकेची ही दुसरी वेळ आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेंज सर्व्हर’वरील हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचा ठपका ठेवला होता.

अमेरिकेचा अंतर्गत सुरक्षा विभाग व प्रमुख तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) सायबरसुरक्षेच्या मुद्यावर अ‍ॅलर्ट जारी केला. या अ‍ॅलर्टमध्ये चीनने केलेल्या सायबरहल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 2011 ते 2013 या कालावधीत चिनी हॅकर्सच्या गटांनी अमेरिकेतील 23 इंधनवाहिनी कंपन्यांना लक्ष्य केले. चिनी हॅकर्सनी सलग दोन वर्षे ‘स्पिअरफिशिंग अ‍ॅण्ड इंट्य्रुजन कँपेन’च्या सहाय्याने या कंपन्यांवर सायबरहल्ले चढविले, असा आरोप अमेरिकी यंत्रणांनी केला आहे. यातील 13 कंपन्यांना दैनंदिन व्यवहारांमध्ये फटका बसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-was-behind-the-cyber-attacks-on-us-fuel-pipelines-in-the-last-decade/