अमेरिकेच्या घणाघाती हवाई हल्ल्यानंतर तालिबानने परिणामांची धमकी दिली

परिणामांची धमकी

काबुल – अमेरिकेने अफगाणिस्तानच्या कंदहार आणि हेल्मंड भागात तालिबानवर जबरदस्त हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यात तालिबानला फार मोठी हानी सहन करावी लागली. यावर तालिबानची प्रतिक्रिया आली आहे. याचे गंभीर परिणाम होतील, असे तालिबानने अमेरिकेला धमकावले आहे. याचा अर्थ तालिबान माघार घेण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ले चढविणार का, ते तालिबानने उघड केलेले नाही. पण या हल्ल्याचे फार मोठे पडसाद उमटले असून अफगाणिस्तानात तालिबानची मनमानी चालू देणार नाही, असा स्पष्ट संदेश अमेरिकेने या हल्ल्याद्वारे दिला आहे.

तालिबानने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दाकमध्ये घडविलेल्या भीषण रक्तपातात 100 हून अधिक नागरिकांचा बळी गेला. काही मृतदेह अजूनही स्पिन बोल्दाकच्या रस्त्यावर पडून असल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते मिरवाईज स्तानिकझई यांनी स्पिन बोल्दाकमधील तालिबानच्या क्रौर्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. ‘पाकिस्तानच्या पंजाबमधील नेतृत्वाकडून येणार्‍या आदेशावरून तालिबान निष्पाप अफगाणींची कत्तल करीत आहेत. यामुळे शत्रूचा खरा चेहरा समोर आला आहे’, असा आरोप स्तानिकझई यांनी केला. तसेच तालिबानने अमेरिकी लष्करासाठी दुभाषी म्हणून काम करणार्‍या अफगाणींचे शिरच्छेद केला. या घटनांमुळे तालिबानची दहशत वाढून अफगाणिस्तानचे सरकार अधिकच दुबळे बनल्याचे चित्र दिसू लागले होते. याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-threatened-repercussions-after-heavy-us-airstrikes/