अफगाणिस्तानातून अपमानास्पद माघार घेतल्यानंतर अमेरिका जागतिक महासत्ता राहिलेली नाही – ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांचा टोला

लंडन – अफगाणिस्तानमधील अपमानजनक माघारीनंतर अमेरिका ही जागतिक महासत्ता राहिली नसल्याचा टोला ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी लगावला आहे. यावेळी संरक्षणमंत्री वॉलेस यांनी ब्रिटनदेखील महासत्ता राहिली नसून, गेल्या पाच दशकांमध्ये अमेरिकेच्या सहकार्याशिवाय मोठी लष्करी तैनाती करण्यात असमर्थ ठरल्याची कबुलीही दिली. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे संसद सदस्य व माजी सुरक्षा सल्लागारांनीही अमेरिकेच्या माघारीवर टीकास्त्र सोडताना, त्यामुळे चीनला अधिक बळ मिळाल्याचा दावा केला होता.

जागतिक महासत्ता

अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराची माघार पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासनावर होणाऱ्या टीकेची धार अधिकच तीव्र होऊ लागली आहे. अमेरिकेच्या माघारीच्या निर्णयावर ब्रिटनसह इतर नाटो सदस्य देशांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. आता माघारीच्या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानातील वास्तव स्थिती समोर येत असतानाच अमेरिकेतील प्रमुख नेत्यांसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून बायडेन प्रशासनाला पुन्हा आक्रमकरित्या लक्ष्य करण्यात येत आहे. ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेली टीका त्याचाच भाग आहे.

जागतिक महासत्ता

संरक्षणमंत्री वॉलेस यांनी ‘स्पेक्टॅटर’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेला लक्ष्य केले. ‘एक महासत्ता विशिष्ट धोरणावर ठाम राहण्यासाठी सज्ज नसेल, तर तिला कदाचित महासत्ता म्हणता येणार नाही. असा देश जागतिक स्तरावरील सामर्थ्यशाली दल नक्कीच नाही, त्याला केवळ एक मोठी सत्ता म्हणता येईल’, असा टोला ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी लगावला. यावेळी त्यांनी ब्रिटन हा देशदेखील महासत्ता राहिलेला नाही, याची कबुलीही दिली. जागतिक पातळीवर मोठी लष्करी तैनाती करण्यासाठ ब्रिटन अमेरिकेवर अवलंबून असल्याकडेही वॉलेस यांनी यावेळी लक्ष वेधले.

तालिबान अफगाणिस्तानमधील शहरांवर ताबा मिळवित असतानाही ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी बायडेन प्रशासनाला लक्ष्य केले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेऊन फार मोठी चूक केली, असे वॉलेस यांनी खडसावले होते. तालिबानने सत्ता मिळविल्यास अल कायदाचा पुन्हा उदय होऊ शकतो, असेही संरक्षणमंत्री वॉलेस यांनी बजावले होते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही अमेरिकेविरोधात नाराजी व्यक्त केली होती. अफगाणिस्तान मुद्यावर ब्रिटनकडून अमेरिकेवर करण्यात येणारी टीका व निर्माण झालेला तणाव दोन देशांमधील ‘स्पेशल रिलेशनशिप’ला कमकुवत करणारा ठरु शकतो, असा दावा ब्रिटनमधील विश्‍लेषक करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info