लंडन/बीजिंग – चीनने वारंवार दिलेले इशारे धुडकावून लावत ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ आपल्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली. ब्रिटीश नौदलाच्या या मोहिमेवर चिनी प्रसारमाध्यमे व विश्लेषकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ब्रिटन अमेरिकेचा पाळलेला कुत्रा असल्याची संभावना ‘ग्लोबल टाईम्स’मधून करण्यात आली आहे. त्याचवेळी ब्रिटनला धमकावण्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने साऊथ चायना सीमध्ये एकाच वेळी दोन सरावांना सुरुवात केल्याचेही समोर आले आहे.
गेल्या काही वर्षात साऊथ चायना सीमध्ये चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राकडे अधिक लक्ष पुरविण्याचे संकेत दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनने आपली नवी विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ साऊथ चायना सीमध्ये पाठविण्याचे जाहीर केले होते. ब्रिटनने ही घोषणा केल्यानंतर चीनने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ब्रिटनच्या या मोहिमेमुळे दोन देशांमधील संबंधांना धक्का बसेल, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यात चीनने वारंवार या मुद्यावरून ब्रिटनवर दडपण आणण्याचेही प्रयत्न केले होते.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/britains-hms-queen-elizabeth-arrives-in-south-china-sea/