ओमिक्रॉनच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात कोरोनाची तीव्रता वाढली

- १०८ देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग

१०८ देशांमध्ये

वॉशिंग्टन/बु्रसेल्स – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा जगभरातील फैलाव अत्यंत वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या व्हेरिअंटचा संसर्ग जवळपास १०८ देशांमध्ये पसरला असून रुग्णांची संख्या दीड लाखांवर गेल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व युरोपसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होत असून आशियाई देश तसेच ऑस्ट्रेलियातही फैलाव वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन’ने (डब्ल्यूएचओ) ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दर तीन दिवसांनी १०० टक्क्यांहून अधिक भर पडत असल्याचे बजावले होते.

अमेरिकेतील अनेक भागांमध्ये ओमिक्रॉन हा ‘डॉमिनंट व्हेरिअंट’ म्हणून समोर येत आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल ६१४ टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेतील रुग्णसंख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढली असून शुक्रवारी देशात तब्बल दोन लाख, ६१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे दगावणार्‍यांच्या संख्येतही अवघ्या २४ तासात ५० टक्क्यांची भर पडली असून शुक्रवारी तीन हजार, ३५४ जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील ‘आयएचएमई’ या अभ्यासगटाने येत्या दोन महिन्यांमध्ये अमेरिकेत १४ कोटी नवे रुग्ण आढळू शकतात, असा इशारा दिला आहे. अमेरिकेत प्रतिदिनी आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या २८ लाखांपर्यंत जाईल, असे बजावले आहे.

१०८ देशांमध्ये

अमेरिकेबरोबरच युरोपातही कोरोनाचे संकट भयावहरित्या वाढत असल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमध्ये गेले तीन दिवस एक लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख, २२ हजारांवर गेली असून हा साथीच्या काळातील नवा रेकॉर्ड ठरला आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारी २४ तासांच्या अवधीत ९४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी संपलेल्या आठवड्यात युरोपिय देशांमध्ये ३० लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून जगातील एकूण कोरोना रुग्णसंख्येत हे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे जगभरात ५० हजारांहून अधिक जण दगावले असून त्यातील ५४ टक्के बळी युरोपिय देशांमधील असल्याचे समोर आले आहे.

१०८ देशांमध्ये

अमेरिका व युरोपपाठोपाठ आफ्रिका, आशिया तसेच ऑस्ट्रेलियामध्येही कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. इथिओपियामधील रुग्णसंख्या अवघ्या आठवड्याभरात सात पटीने वाढली असून केनियामधील रुग्णांच्या संख्येत ४८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त मोझांबिक, झांबिया व बोटस्वाना या देशांमधील रुग्ण १५० ते ३५० टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येते. आफ्रिकेतील एकूण २२ देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. आग्नेय आशियातील सिंगापूर, मलेशिया, थायलंड व इंडोनेशियामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. जपान व दक्षिण कोरियातही रुग्णसंख्या वाढल्याचे वृत्त आहे. ऑस्ट्रेलियात शनिवारी सुमारे १० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या संसर्गाचा सर्वात मोठा फटका आंतरराष्ट्रीय हवाईक्षेत्राला बसला आहे. गेल्या ४८ तासांमध्ये जगभरातील विविध विमानकंपन्यांनी तब्बल चार हजारांहून अधिक फेर्‍या रद्द केल्या आहेत. त्यामुळे जगातील अनेक विमानतळांवर लाखो प्रवासी अडकून पडल्याचे समोर आले आहे. नाताळच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय झाल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाल्याचे सांगण्यात येते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info