अफगाणी लष्कराच्या हवाई हल्ल्यात शंभराहून अधिक तालिबानी ठार

काबुल/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर हल्ला चढवून एका जवानाचा बळी घेणार्‍या तालिबानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आणि युद्धगुन्हा असल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघाने केली. तर अमेरिकेने संघर्षबंदी लागू करण्याचे आवाहन केले. याकडे दुर्लक्ष करून तालिबानने सलग दुसर्‍या दिवशी हेरातमधील हिंसाचार सुरू ठेवला. अफगाणी लष्कराने हेरातमध्ये गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत तालिबानच्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

अफगाणिस्तानच्या पश्‍चिमेकडे इराणच्या सीमेजवळ असलेल्या हेरात प्रांताचा पूर्ण ताबा मिळविण्यासाठी तालिबानने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रांतातील 17 जिल्ह्यांपैकी राजधानी हेरात शहर आणि गुझारा जिल्ह्यांवर अफगाण सरकारचे नियंत्रण आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून तालिबानच्या दहशतवाद्यांनी हेरात आणि गुझारावरील हल्ले वाढविले. या हल्ल्यांना अफगाणी लष्कर तसेच स्थानिक टोळ्यांकडून प्रत्युत्तर मिळत आहे. पण शुक्रवारी रात्री हेरातमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रांतीय मुख्यालयाच्या इमारतीवर हल्ला चढविल्यानंतर मोठी खळबळ उडाली.

अफगाणिस्तानातील मानवतावादी सहाय्याची व्यवस्था पाहणार्‍या इमारतीला लक्ष्य करून तालिबानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी ठेवला. तसेच यासाठी तालिबानवर युद्धगुन्हे लादले जाऊ शकतात, असा इशारा गुतेरस यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी हेरातमधील घटनेचा निषेध केला. तसेच अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करून वाटाघाटी सुरू करण्यासाठी अफगाण सरकार व तालिबानने प्रयत्न करावे, असे आवाहन सुलिवन यांनी केले.

अफगाणिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये आपले कायदे लागू करून मुली-महिलांवर जाचक अटी लादणार्‍या तालिबानने अमेरिकेच्या आवाहनाला अजिबात किंमत दिली नसल्याचे दिसते. अफगाणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून तालिबानने हेरातवर ताबा मिळविण्यासाठी आपले हल्ले तीव्र केले आहेत. येथील मालन पुलाजवळचा भाग तालिबानने ताब्यात घेतला तसेच अफगाणी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरला ठार केल्याचा दावा केला जातो.

गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने हेरात तसेच गुझारा आणि गुलरान या जिल्ह्यांच्या सुरक्षेसाठी मोठी मोहीम छेडली आहे. अफगाणी हवाईदलाने गुझारामधील कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. गुझारा तालिबानच्या ताब्यात गेले तर राजधानी हेरात देखील कोसळेल, असे बोलले जाते. तर अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील जोवझान प्रांतातील हवाई हल्ल्यात 21 दहशतवादी मारले.

दरम्यान, अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानसमर्थकांना उद्देशून इशारा दिला. अफगाणिस्तानचे लष्कर आणि जनता तालिबान किंवा त्यांच्या समर्थकांच्या समोर अजिबात झुकणार नसल्याचे सांगून उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानी लष्करावर निशाणा साधला.