तेल अविव – ‘इराणने 2015 सालच्या अणुकरारातील सर्व सूचना धुडकावल्या आहेत. आता इराण अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक साहित्य मिळविण्यापासून फक्त 10 आठवडे दूर आहे. हीच इराणवर कारवाई करण्याची योग्य वेळ ठरते’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर इराणपासून इस्रायलबरोबर क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षेलाही धोका असल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले.
येत्या काही दिवसात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक पार पडेल. या बैठकीत इराणचा आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम तसेच आखातातील इराणच्या लष्करी हालचाली यांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी इस्रायलने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांच्या राजनैतिक अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणने सहा वर्षांपूर्वीच्या अणुकराराचे उल्लंघन केल्याचे लक्षात आणून दिले.
2015 साली पार पडलेल्या अणुकरारानुसार, इराणला युरेनियमचे संवर्धन व सेंट्रिफ्युजेसची संख्या मर्यादित ठेवण्याची सूचना केली होती. पण इराणने गेल्या सहा महिन्यांमध्ये या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इराणच्या नेत्यांनी यासंबंधीची माहिती दिली तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने याला पुष्टी दिली होती. याकडे लक्ष वेधून इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणवर कारवाई करण्याची मागणी केली.
पुढच्या 10 आठवड्यांमध्ये इराण अणुबॉम्बची निर्मिती करण्याचे साहित्य मिळवू शकतो. यापासून इराणला रोखायचे असेल तर या देशावर कठोर आर्थिक निर्बंध लादावे. तसेच आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून वाहतूक करणार्या मालवाहू व इंधनवाहू जहाजांवर हल्ले चढविणार्या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या विरोधात प्रभावी कारवाई करावी, अशा मागण्या गांत्झ यांनी केल्या. इराणच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे गांत्झ म्हणाले.
गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने इराणच्या विरोधातील आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. ओमानच्या सागरी क्षेत्राजवळ इंधनवाहू जहाजावर इराणने ड्रोन्सचे हल्ले चढविल्यानंतर इस्रायलने इराणवर कारवाईची मागणी उचलून धरली. इस्रायलच्या या मागणीला अमेरिका, ब्रिटनने समर्थन दिले. दरम्यान, इब्राहिम रईसी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असताना, इस्रायल अधिक आक्रमक झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |