‘युक्रेन’मुळे अणुयुद्ध भडकण्याचा धोका अधिकच बळावला आहे

- रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मॉस्को – ‘अणुयुद्ध रोखण्यासाठी रशिया खूप प्रयत्न करीत आहे. पण युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढला असून तो वास्तववादी आहे. या धोक्याकडे दुर्लक्ष करू न चालणार नाही’, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. तसेच हे युद्ध रोखण्याचे आवाहन करणारी अमेरिका व नाटोच युक्रेनला शस्त्रसज्ज करीत असल्याचा ठपका रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला आहे.

अणुयुद्ध

अमेरिका व नाटोच्या या कारवाया युद्ध दीर्घकाळासाठी लांबविणाऱ्या असल्याचा दावा लॅव्हरोव्ह यांनी केला. काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनला भेट देऊन अतिरिक्त 70 कोटी डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. तसेच रशियाला पुन्हा युक्रेनसारखे दुसरे युद्ध छेडता येणार नाही इतके कमकुवत करायचे आहे, असे सांगून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियावरील निर्बंध तसेच लष्करी सहाय्याचे समर्थन केले होते. त्यानंतर रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा हा इशारा आला आहे.

अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त 70 कोटी डॉलर्सचे लष्करी सहाय्य घोषित केले आहे. यानंतरही युक्रेनने अमेरिकेकडून दर महिना दोन अब्ज तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीन अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनच्या अर्थमंत्र्यांनी अमेरिकन दैनिकाशी बोलताना हे आवाहन केल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत. बायडेन प्रशासनाने युक्रेनच्या या मागणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यासाठी अमेरिकेने या आठवड्यात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये 40हून अधिक देश सहभागी होणार असल्याचा दावा केला जातो. रशियाच्या हल्ल्याचे युक्रेनच्या संरक्षणदलांचे जबर नुकसान झाले आहे. युक्रेनचे हवाईदल पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा रशियाने केला होता. या पार्श्वभूमीवर नाटो सदस्य देशांनी युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवावे, असे आवाहन अमेरिका या बैठकीतून करणार आहे. अमेरिका व नाटोच्या या दुटप्पी धोरणावर रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी टीका केली.

अणुयुद्ध

रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध शीतयुद्धापेक्षाही वाईट स्थितीत असल्याचे लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनचे लष्कर व रशियाविरोधी गटांना शस्त्रसज्ज करून नाटोने रशियाविरोधात छुपे युद्ध छेडल्याचा आरोप रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी मुलाखतीदरम्यान केला. तर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रसज्ज करणे सुरू ठेवल्यामुळे अणुयुद्धाचा धोका वाढल्याचा इशारा लॅव्हरोव्ह यांनी दिला. येत्या काळात युक्रेनच्या हाती येणारी पाश्चिमात्य देशांचा हा शस्त्रसाठा रशियाच्या कारवाईचे लक्ष्य ठरेल, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले.

शीतयुद्धाच्या काळातील ‘क्युबन क्रायसिस’चा उल्लेख रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केला. ‘क्युबन क्रायसिसच्या काळात कुठलेही लिखित स्वरुपाचे नियम नव्हते. पण दोन्ही देशांना आपापल्या मर्यादा लक्षात होत्या’, असे सांगून सध्याचे युद्ध या चौकटीत बसत नसल्याचे संकेत लॅव्हरोव्ह यांनी दिले. तसेच त्याकाळात अमेरिका व सोव्हिएत रशियाच्या नेत्यांमध्ये संपर्क यंत्रणा होती आणि त्यावर विश्वास ठेवता येत होता. पण आत्ता दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये संपर्क उरलेला नसल्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info