चीनच्या वुहानसह ४० शहरांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चा भयंकर उद्रेक – चीनच्या कोरोनाविरोधी मोहिमेवर शंका

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंग व कोरोनाचा उगम असलेल्या वुहान शहरासह ४० शहरांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी चीनच्या विविध शहरांमध्ये १२४ रुग्ण आढळले असून नव्या साथीतील रुग्णांची संख्या ५०० वर गेली आहे. चीनमधील या नव्या साथीने देशाच्या कोरोनाविरोधातील मोहिमेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

उद्रेक

२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरात कोरोना साथीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुढील काही महिन्यात लॉकडाऊन, मास टेस्टिंग, मोठ्या हॉस्पिटल्सची उभारणी व स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या लसीच्या जोरावर कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचा दावा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केला होता. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहानसह इतर शहरांमध्ये पार्टी तसेच इतर कारणांसाठी झालेल्या गर्दीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते.

आपली साथ नियंत्रणात आणल्याचे दावे करणार्‍या चीनने पाश्‍चात्यांसह इतर देशांकडून कोरोनाविरोधात राबविण्यात येणार्‍या मोहिमेवर टीकास्त्र सोडले होते. त्याचवेळी चीनच्या राजवटीने आपल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्याचीही माहिती दिली होती. चिनी यंत्रणांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत १.७ अब्ज लसी देण्यात आल्या आहेत. मात्र नक्की किती नागरिकांना लस देण्यात आली आहे, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

या पार्श्‍वभूमीवर साथीचा नवा उद्रेक चीनच्या सत्ताधारी राजवटीसह स्थानिक यंत्रणांसाठी नवे आव्हान ठरत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील नव्या उद्रेकाचे बहुतांश रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असून हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. चीनच्या यंत्रणांनी हा धोका नीट लक्षात घेतला नसल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. चीनच्या लसी ‘डेल्टा व्हेरिअंट’विरोधात सक्षम असल्याचे दावे करण्यात आले असले तरी त्याचे वैज्ञानिक पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे लसीकरण कितपत फायदेशीर ठरेल, याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

चीनमधील कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच देशातील प्रमुख वैज्ञानिक शी झेंग्ली यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत इशारा दिला आहे. ‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूमध्ये अंतर्गत बदल होण्यास अधिक संधी उपलब्ध होतील. कोरोनाच्या विषाणूचे नवे प्रकार समोर येत राहतील’, असे झेंग्ली यांनी बजावले आहे. झेंग्ली गेल्या दशकभराहून अधिक काळ कोरोना विषाणूंबाबत संशोधन केले असल्याने त्यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही दिवसांपूर्वी ‘सेज’ या पाश्‍चात्य गटानेही कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिअंट’बाबत गंभीर इशारा दिला होता. कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ संक्रमित झालेल्या रुग्णांपैकी ३५ टक्के जणांचा बळी घेण्याइतपत घातक ठरु शकतो, असे ‘सेज’ने बजावले होते.

दरम्यान, चीनच्या आघाडीच्या संशोधनसंस्थेतील एका संशोधकाला कोरोनाची बाधा झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. एका अमेरिकी वेबसाईटने यासंदर्भात दावा केला आहे. चीनच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरल डिसिज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेंशन’च्या (एनआयव्हीडीसी) वरिष्ठ संशोधकांना २०२० सालच्या सुरुवातलाच कोरोना झाला होता. चीनमधील काही संशोधकांच्या ईमेल्समधून ही माहिती उघड झाली आहे. यापूर्वी २००४ साली चीनमधून आलेली ‘सार्स’ची साथही ‘एनआयव्हीडीसी’मधूनच सुरू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info