अमेरिकेकडून आखाती क्षेत्रात बॉम्बर्स विमानांची नवी तैनाती

अमेरिकेकडून आखाती क्षेत्रात बॉम्बर्स विमानांची नवी तैनाती

वॉशिंग्टन – अमेरिकेची आणखी दोन अण्वस्त्रसज्ज ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमाने आखातात दाखल झाली आहेत. या क्षेत्रातील अरब मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका बांधिल आहे, हे दाखवून देण्यासाठी ही तैनाती केल्याचे अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ने म्हटले आहे. गेल्या ४५ दिवसात अमेरिकेने या क्षेत्रात बॉम्बर्स विमानांची केलेली ही तिसरी तैनाती असल्याचे अमेरिकी माध्यमे लक्षात आणून देत आहेत. अमेरिकेची आण्विक पाणबुडी ‘युएसएस जॉर्जिया’ काही दिवसांपूर्वीच या सागरी क्षेत्रात दाखल झाली होती.

अमेरिकेच्या ‘नॉर्थ डाकोटा’ येथील हवाईतळावरुन उड्डाण केलेली ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमाने ३० तासांचा प्रवास करून बुधवारी पर्शियन आखातात दाखल झाली. आखाती क्षेत्रासाठी अमेरिकेने उभारलेल्या ‘सेंट्रल कमांड’ अर्थात ‘सेंटकॉम’ या लष्करी विभागाने या बॉम्बर्स विमानांच्या तैनातीची माहिती दिली. या क्षेत्रातील आक्रमक आणि धोकादायक शत्रूंपासून आपल्या सहकारी देशांची सुरक्षा करण्यास अमेरिका बांधिल आहे, हा विश्‍वास देण्यासाठी ही तैनाती केल्याचे ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी म्हटले आहे.

या विमानांनी आखाती देशांच्या हवाईहद्दीत प्रवेश करताच पर्शियन आखातातून गस्त घातली. अणुबॉम्बने सज्ज असलेल्या या ‘स्ट्रॅटोफोर्टेस’ अर्थात ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांची ही गस्त म्हणजे इराणसाठी इशारा ठरतो, असे अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. इराकसह आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्याची धमकी इराणचे नेते व लष्करी अधिकारी सातत्याने देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, ही तैनाती केल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

वर्षभरापूर्वी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी ठार झाले होते. या घटनेला येत्या रविवारी वर्ष पूर्ण होत आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी इराण व इराणसंलग्न दहशतवादी गट संधीच्या प्रतिक्षेत बसल्याचा दावा केला जातो. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील सुलेमानी यांच्या हत्येचा अतिशय भीषण सूड घेतला जाईल, अशा धमक्या देत आहेत. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनानी काही दिवसांपूर्वी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्ले चढविले होते. अशा परिस्थितीत, इराणकडून हल्ल्यांची शक्यता बळावल्यामुळे अमेरिकेने या बॉम्बर्स विमानांची तैनाती करून इराणला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या बॉम्बर्स विमानांच्या तैनातीनंतर इराणकडून जोरदार प्रतिक्रिया उमटली. अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी निमित्त शोधत आहे. बनावट हल्ल्याचे कारण देऊन अमेरिका इराणवर कारवाई करील, अशी शक्यता इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरिफ यांनी वर्तविली आहे.

‘‘‘बी५२ बॉम्बर्स आणि युद्धनौकांचा ताफा या क्षेत्रात रवाना करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेच्या अब्जावधी डॉलर्सचा चुराडा करीत आहेत. इराकमधील गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका इराणविरोधात युद्ध छेडण्यासाठी निमित्त शोधत आहे. इराणला युद्ध करायचे नाही, पण आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी इराण अधिक आक्रमकतेने युद्धात सहभागी होईल’’, अशी धमकी परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी दिली. दरम्यान, पर्शियन आखातात अण्वस्त्रसज्ज बॉम्बर्स आणि आण्विक पाणबुडी तैनात करीत असताना, अमेरिकेने या क्षेत्रातील ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका मात्र माघारी घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info