काबुल – अमेरिका व अफगाणिस्तानच्या लष्कराने चढविलेल्या हवाई हल्ल्यात गेल्या २४ तासात ५७९ तालिबानी दहशतवादी ठार झाले. हवाई हल्ल्यांमध्ये ठार होणार्या तालिबानींची संख्या प्रतिदिनी वाढत चालली असून यावर तालिबानने आगपाखड सुरू केली आहे. आखातातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या प्रवक्त्याने या हवाई हल्ल्यांवरून अमेरिका व अफगाणिस्तानच्या सरकारला धमक्या दिल्या. हवाई हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी सोसावी लागल्याची अप्रत्यक्ष कबुलीच या धमक्यांद्वारे तालिबानने दिली आहे.
अमेरिकेच्या ‘बी-५२ स्ट्रॅटोफोर्टेस’ या बॉम्बर विमानाने दोन दिवसांपूर्वी शेबेरघन शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचे २०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्याचबरोबर मोठ्या शस्त्रास्त्रांसह तालिबानची शंभराहून अधिक वाहने नष्ट झाली. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमन यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील जोवझान प्रांताची राजधानी शेबेरघनचा ताबा घेतला होता. पण अमेरिकेच्या या कारवाईमुळे तालिबान संतापल्याचे दिसते.
अमेरिका आणि अफगाणी लष्कराच्या या हवाई हल्ल्यांमध्ये किती दहशतवादी ठार झाले, याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर केली नाही. पण या हल्ल्यांद्वारे अमेरिका अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप तालिबानने केला. तसेच राष्ट्राध्यक्ष गनी यांच्या सरकारबरोबर तालिबानची संघर्षबंदी झाली नव्हती, असे सांगून तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणिस्तानातील हल्ले वाढविण्याची धमकी दिली. तसेच पंधराहून अधिक प्रांतांमध्ये हवाई हल्ले चढविणारे अफगाणिस्तानचे सरकार येथील तणाव वाढवित असल्याची टीका तालिबानच्या प्रवक्त्याने केली.
तालिबानच्या या धमकीला अमेरिका व अफगाणिस्तानच्या सरकारने उत्तर दिलेले नाही. पण गेल्या चोवीस तासात अमेरिका व अफगाणी लष्कराने तालिबानवरील हल्ले तीव्र केल्याच्या बातम्या येत आहेत. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बलख व तखर या दोन प्रांतात तालिबान आणि लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. तर तालिबानच्या ठिकाणांवरील हल्ल्यांसाठी अमेरिकेने ‘बी-५२’ बॉम्बर्स, ‘एसी१३०’ गनशिप यांच्यासह ‘एफ-१५’ आणि ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांचाही वापर केल्याचा दावा केला जातो.
अमेरिकेने तालिबानवर सुरू केलेल्या या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानातून टीका होत आहे. अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढवून दोहा कराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी व पत्रकार करीत आहेत. तालिबानमध्ये मोठा बदल झाला असून अमेरिका व अफगाणिस्तानचे सरकार त्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रचार पाकिस्तानी माध्यमांनी सुरू केला. तर अमेरिकेची विमाने तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी कोणत्या हवाई हद्दीचा वापर करतात? असा प्रश्न काही पाकिस्तानी पत्रकारांना पडला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानची शहरे आणि जिल्ह्यांवर ताबा घेणारे तालिबानचे दहशतवादी पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते यांची निघृण हत्या करीत आहे. पाकतिया घग य रेडिओ स्टेशनचे संपादक तुफान ओमारी यांची हत्या करण्यात आली. तर नैमातुल्ला हेमात या पत्रकाराचे तालिबानने अपहरण केले आहे. यामुळे पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला, तरी तालिबान दहशतवादी संघटनाच असल्याची खात्री आंतरराष्ट्रीय समुदायाला पटलेली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |