चीनने तैवानच्या आखातातील युद्धसरावाची व्याप्ती वाढविली

- पाणबुड्यांना जलसमाधी देण्याचा युद्धसराव सुरू; तैवानने लष्कराला हाय अलर्टवर ठेवले

बीजिंग – अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याचा निषेध म्हणून चीनने तैवानच्या आखातात युद्धसराव सुरू केला होता. चीनच्या लष्कराचा हा सराव रविवारी पूर्ण झाला. पण चीनने आणखी चार दिवसांसाठी आपला युद्धसराव सुरू ठेवण्याची घोषणा केली. आधीचा युद्धसराव आपल्याविरोधातच असल्याचा आरोप तैवानने केला होता. तर चीनचा हा विस्तारीत युद्धसराव या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकेसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.

चीनने

गेल्या आठवड्यात पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. यानंतर पुढच्या काही तासातच चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने तैवानला घेरणाऱ्या युद्धसरावांची घोषणा केली होती. तसेच चीनची क्षेपणास्त्रे तैवानची हवाई हद्द ओलांडून पूर्वकडील सागरी क्षेत्रात कोसळल्याच्या बातम्या आल्या होत्या. या सरावात चीनने तैवानच्या दिशेने तब्बल 11 डाँगफेंग क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली होती. तर चीनच्या दीडशेहून अधिक लढाऊ विमाने, बॉम्बर्सनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून प्रवास केला होता. चीनचा हा सराव तैवानला इशारा देणारा असल्याचा तसेच तैवानवर हल्ले चढविण्याचा सराव असल्याचा ठपका तैवानने ठेवला होता.

तैवानच्या भोवती सुरू झालेला हा सराव रविवारी दुपारी पूर्ण झाला. चीननेच याची घोषणा केली होती. पण पुढच्या काही तासातच चीनने ‘प्रॅक्टिकल जॉईंट एक्सरसाईज इन सी अँड एअरस्पेस’ हा सराव सुरू केला आहे. याअंतर्गत क्षेपणास्त्रांचा हल्ला, तैवानच्या आखातातील लढाऊ विमाने आणि पाणबुड्या व विनाशिकांना टिपण्याचा सराव केला जाईल. तर चीनचा हा सराव तैवानचे आखात व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांना इशारा देण्यासाठी असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. हा सराव देखील तैवानच्या सागरी हद्दीपर्यंत पुढे नेण्याचे चीनने ठरविल्याचा दावा युरोपिय माध्यमांनी केला आहे.

चीनने

चीनने नव्याने सुरू केलेल्या या युद्धसरावावर तैवानने जोरदार टीका केली आहे. चीनचा युद्धसराव या क्षेत्रातील तणाव वाढविणारा असून यामुळे या क्षेत्रातील देशांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचा ठपका तैवानने ठेवला. ऑस्ेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी देखील यावरून चीनवर जोरदार ताशेरे ओढले. पेलोसी यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करून चीनने या क्षेत्रातील तणाव वाढविण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन करू नये, असा आरोप पराष्ट्रमंत्री वाँग यांनी केला. तसेच चीनने हा तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वाँग यांनी केले.

दरम्यान, चीनचा युद्धसराव नव्या संकटाच्या मालिकेचे शिखर गाठणारा असल्याचा इशारा फ्रान्समधील विश्लेषक देत आहेत. तणाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून केल्या जाणाऱ्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून चीन येथील तणावात भर टाकत असल्याचे, फ्रान्सचे विश्लेषक बजावत आहेत. मात्र आपल्यावर होणाऱ्या या टीकेकडे दुर्लक्ष करून चीन आपल्या सामर्थ्यप्रदर्शनाला सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे दिसते. ही बाब चिनी राजवटीच्या अंतर्गत राजकारणाशी जोडलेली असल्याचे काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info