40 ‘हॉवित्झर्स’सह तैवानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचा अमेरिकेचा निर्णय

आधुनिक हथियार

वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला 40 ‘हॉवित्झर्स’ तोफांसह इतर शस्त्रे पुरविण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने तैवानला शस्त्रपुरवठा करण्याबाबत घेतलेला हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. या निर्णयाबाबत तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे आभार मानले आहेत. त्याचवेळी चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून चीन याला तीव्र प्रत्युत्तर देईल, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधातील आक्रमक धोरणाचा भाग म्हणून तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिका व तैवानमध्ये ‘एफ-16 व्ही’ या लढाऊ विमानांच्या खरेदीचा महत्त्वाकांक्षी करार करण्यात आला होता. त्यापाठोपाठ अमेरिकेने तैवानला ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘हाय मार्स’ रॉकेट यंत्रणा, ‘स्लॅम-इआर’ क्षेपणास्त्रे देण्याचीही घोषणा केली होती. याच काळात तैवानने ’पॅट्रियट मिसाईल्स’, ड्रोन्स, स्मार्ट माईन्स व हॉवित्झर्ससंदर्भात बोलणी सुरू केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यातील ‘हॉवित्झर्स’ पुरविण्यास मंजुरी दिल्याचे परराष्ट्र विभागाच्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-decision-to-supply-taiwan-with-advanced-weapons/