काबुल – अफगाणी लष्कराने गेल्या चोवीस तासातील कारवाईत 217 तालिबानींना ठार केल्याचे जाहीर केले. पण यामुळे तालिबानच्या हल्ल्यांवर परिणाम झालेला नाही. गुरुवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी गझनी प्रांताची राजधानी ताब्यात घेतली. गेल्या बारा दिवसात तालिबानने दहा प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेतला आहे. गझनीवरील तालिबानचे वर्चस्व राजधानी काबुलसाठी धोकादायक मानले जाते. त्याचवेळी हेल्मंड प्रांताची राजधानी लश्करगह येथील पोलीस मुख्यालयावरही तालिबानच्या दहशतवाद्यांनी ताबा घेतल्याच्या बातम्या येत आहेत.
पुढच्या 30 दिवसात तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबुलची कोंडी करील आणि 90 दिवसात काबुलचा ताबा घेईल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने काही तासांपूर्वी दिला होता. गुरुवारी गझनी प्रांताची राजधानी गझनी ताब्यात घेऊन तालिबानने अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचा इशारा प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. काबुलपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले गझनी शहर म्हणजे अफगाणिस्तानच्या राजधानीशी जोडणारा महामार्ग म्हणून ओळखला जातो. दोन दशकांपूर्वी अमेरिका व नाटो लष्कराने अफगाणिस्तानात छेडलेल्या मोहिमेत काबुलचा ताबा घेण्याआधी गझनीवर नियंत्रण मिळविले होते. त्यामुळे आता तालिबानने गझनीचा ताबा घेऊन, काबुलकडे लक्ष वळविल अशी चिंता व्यक्त केली जाते.
गझनीचा ताबा घेण्याआधी तालिबानच्या दहशतवाद्यांनी लश्करगह येथील पोलीस मुख्यालयाचा ताबा घेतल्याची बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका हेल्मंडची राजधानी लश्करगहवर हवाई हल्ले चढवित आहे. या कारवाईत तालिबानचे दहशतवादी मोठ्या संख्येने ठार होत असून त्यांचे प्रेते रस्त्यावर पडल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. अशा परिस्थितीत, तालिबानने पोलीस मुख्यालयाचा ताबा मिळविल्यामुळे स्थानिकांमध्ये भीती पसरली आहे. लश्करगहप्रमाणे तालिबानने हेरात प्रांतांची राजधानी हेरातमधील पोलीस मुख्यालयाचा ताबा घेल्याच्या बातम्या येत आहेत. तर सुमारे सहा शहरांमधील कारागृहावर हल्ला चढवून तालिबानने आपल्या एक हजार सहकाऱ्यांची सुटका केली.
इराणजवळच्या सीमाभागातही तालिबान जोरदार हल्ले चढवित आहे. दोन दिवसांपूर्वीच इराणने तालिबानला सीमाभागातील हल्ल्यांची तीव्रता कमी करण्याची सूचना केली होती. पण तालिबान कुणाचेही ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसत आहे. गुरुवारी तालिबानने इराणचे टेहळणी ड्रोन पाडले व त्याचा फोटो प्रसिद्ध केला. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने ही माहिती उघड केली. या घटनेनंतर इराणने मझार-ए-शरीफमधील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावून तात्पुरत्या काळासाठी उच्चायुक्तालय बंद केले आहे.
दरम्यान, तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांमुळे घाबरलेली अफगाणी जनता शेजारी देशांमध्ये आश्रयासाठी धाव घेत आहे. पण पाकिस्तानने स्पिन बोल्दाक-चमन सीमा बंद केल्याचे फोटोग्राफ्स समोर येत आहेत. पाकिस्तानने अफगाणी निर्वासितांना आपल्या देशात आश्रय द्यावा, अशी सूचना अमेरिकेने केली होती. पण पाकिस्तानने याकडे दुर्लक्ष करून अफगाणी निर्वासितांची कोंडी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |