अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार म्हणजे फार मोठी चूक – ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांचा इशारा

वॉशिंग्टन/लंडन – ‘अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेऊन फार मोठी चूक केली. इथे तालिबानची राजवट आली तर अल कायदाचा नव्याने उदय होईल. तसे झाले तर ब्रिटन अफगाणिस्तानात पुन्हा सैन्य तैनात करू शकेल’, असा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला. तर ‘कमकुवतपणा ही युद्धाला जन्म देतो आणि नेतृत्त्वाची कमजोरी काय अनर्थ घडवून आणते, याचा अनुभव आपण घेत आहोत’, अशा जळजळीत टीका करून, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना अफगाणिस्तानातील अपयशासाठी जबाबदार धरले.

बेन वॉलेस

अफगाणिस्तानच्या 18 प्रांतांच्या राजधान्या तालिबानच्या ताब्यात गेल्या आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या 50 किलोमीटर अंतरापर्यंत तालिबानने धडक मारली आहे. कुठल्याही क्षणी तालिबान काबुल ताब्यात घेण्यासाठी घणाघाती हल्ला चढविल, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तालिबानला मिळालेले हे यश आणि अफगाणी सरकार व लष्कराच्या अपयशाला अमेरिकेची आकस्मिक सैन्यमाघार जबाबदार असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. अफागणिस्तानच्या सरकारनेही यासाठी अमेरिकेवर टीका केली होती. आता अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असलेल्या ब्रिटनने देखील बायडेन प्रशासनाची माघार म्हणजे फार मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेवर 9/11चा भयंकर दहशतवादी हल्ला अल कायदाने घडविला होता. त्यासाठी या दहशतवादी संघटनेची पाठराखण तालिबाननेच केली होती, याची आठवण ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी करून दिली. अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या ताब्यात जाण्याचा गंभीर धोका समोर ठाकलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अल कायदाचा उदय होऊ शकतो, असे सांगून संरक्षणमंत्री वॉलेस यांनी साऱ्या जगाला याचा धोका संभवत असल्याची जाणीव करून दिली. अस्थैर्य माजलेले अपयशी देश हे नेहमीच दहशतवादी संघटनांसाठी पोषक ठरतात, याकडे वॉलेस यांनी लक्ष वेधले. म्हणूनच पाश्‍चिमात्य जगाला असलेला अल कायदाचा धोका पुन्हा बळावला, तर ब्रिटन अफगाणिस्तानात पुन्हा सैन्य तैनात करू शकेल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी केली.

बेन वॉलेस

9/11 च्या हल्ल्यानंतर अल कायदाला संपविण्यासाठी अमेरिकेने छेडलेल्या दहशतवादविरोधी युद्धात ब्रिटनने सहभाग घेतला होता. अमेरिकेबरोबरच ब्रिटनचे सैन्यही अफगाणिस्तानात उतरले होते. त्यामुळे ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अफगाणिस्तानातील तालिबानला मिळत असलेल्या यशाला राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन जबाबदार असल्याची घणाघाती टीका केली. बायडेन यांच्या कमकुवत नेतृत्त्वामुळेच तालिबानला अफगाणिस्तानात जोरदार मुसंडी मारण्याची संधी मिळाली, असा ठपका पॉम्पिओ यांनी ठेवला. 9/11 च्या हल्ल्याचा 20वा स्मरणदिन जवळ आलेला असताना, तालिबान अफगाणिस्तानात वर्चस्व गाजवित आहे. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याचा धोका बळावला आहे. असे घडू नये, यासाठी जबरदस्त तयारी करावी लागेल, असा इशारा माईक पॉम्पिओ यांनी दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info