रशियाच्या वॅग्नर ग्रुपने बाखमुत्का नदी ओलांडल्याचा दावा

- युक्रेनी लष्कराकडून ‘ॲझॉम प्लँट’मध्ये मोर्चेबांधणी

मॉस्को/किव्ह – गेल्या आठवड्यात बाखमत शहराच्या पूर्व भागावर ताबा मिळविणाऱ्या रशियाच्या वॅग्नर ग्रुपने शहरात आगेकूच केल्याचे समोर आले आहे. रशियाच्या मिलिटरी ब्लॉगर्सने यासंदर्भात दावे केले असून रशियन लष्करी तुकड्या दक्षिण बाखमतमध्ये शिरल्याचेही म्हटले आहे. रशियाची ही आगेकूच सुरू असतानाच युक्रेनी लष्कराने बाखमतमधील ‘ॲझॉम प्लँट’मध्ये मोर्चेबांधणी केली असून मारिपोलप्रमाणे संघर्ष करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, पोलंड व स्लोव्हाकिया या दोन देशांनी युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याची घोषणा केली आहे.

वॅग्नर

पूर्व युक्रेनमधील अनेक शहरांना जोडणारे मार्ग बाखमतमधून जात असल्याने हे शहर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बाखमत रशियाच्या हाती पडल्यास पूर्व युक्रेनमधील शहरांवर हल्ले करणे रशियासाठी सोपे ठरते. बाखमतवर ताबा मिळाल्यानंतर रशिया चॅसिव यार, स्लोव्हिआन्स्क व क्रॅमाटोर्स्क या शहरांवर हल्ले चढवू शकतो. परिणामी युक्रेनला डोनेत्स्क प्रांतासह डोन्बास क्षेत्रावरील नियंत्रण गमवावे लागू शकते, असे सांगण्यात येते.

वॅग्नर

याची दोन्ही बाजूंना जाणीव असल्याने शहरावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिकिरीची लढाई सुरू आहे. दोन्ही देशांच्या लष्करी तुकड्यांकडून इंच न इंच लढविण्यात येत असून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी तोफा, रॉकेटस्‌‍ व मॉर्टर्सचा जोरादार मारा सुरू आहे. युक्रेनकडील रसद जवळपास संपत आली असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत शहर लढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रशियाकडून बाखमतवरील नियंत्रणासाठी कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही. इतर आघाड्यांवरील काही लष्करी तुकड्या तसेच शस्त्रसामुग्री बाखमतच्या लढाईसाठी तैनात करण्यात आली आहे.

बाखमतचा पूर्व तसेच दक्षिण भाग ‘वॅग्नर ग्रुप’ तसेच रशियन लष्कराच्या ताब्यात आहे. मात्र बाखमुत्का नदीच्या पश्चिमेकडील भाग अजूनही युक्रेनच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते. ही नदी ओलांडण्यासाठी वॅग्नर ग्रुपकडून प्रयत्न सुरू असून काही दिवसांपूर्वी एक भाग पार करण्यात यश मिळाल्याचे दावे करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाखमतमधील कारखान्यांचा परिसर असणाऱ्या ‘ॲझॉम प्लँट’वर युक्रेनने लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी मारिपोल शहरातील कारखान्याचा वापर करून युक्रेनी लष्कराने रशियन लष्कराला अनेक दिवस झुंजवले होते. हेच धोरण बाखमतमध्ये वापरण्याची तयारी सुरू झाल्याचे मानले जाते.

वॅग्नर

दरम्यान, युक्रेनी राजवटीकडून सातत्याने करण्यात आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर दोन युरोपिय देशांनी लढाऊ विमाने पुरविण्याचे जाहीर केले आहे. पोलंड व स्लोव्हाकिया या देशांकडून युक्रेनला ‘मिग-२९’ ही लढाऊ विमाने पुरविण्यात येणार आहेत. पोलंड चार तर स्लोव्हाकिया १३ लढाऊ विमाने देणार असल्याची घोषणा करण्यात आली. पोलंड व स्लोव्हाकियाकडून देण्यात येणारी सर्व विमाने रशिया उडवून देईल, असा इशारा रशियन प्रवक्त्यांनी दिला आहे.

रशियाच्या रोस्तोव्ह ऑन डॉन शहरातील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीला मोठी आग लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. स्थानिक यंत्रणांनी सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती दिली. मात्र सूत्रांनी इमारतीत असलेल्या शस्त्रसाठ्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाल्याचा दावा केला. रशियातील इमारती, मॉल्स तसेच कारखान्यांना वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असून यामागे युक्रेनी यंत्रणांचा हात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info