तैपेई/बीजिंग – आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तैवानला मिळणारे वाढते समर्थन व तैवानकडून संरक्षणसिद्धतेसाठी चाललेल्या हालचाली या पार्श्वभूमीवर चीनने तैवानविरोधातील ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रता वाढविल्याचे समोर आले आहे. गेल्या ७२ तासांमध्ये चीनच्या तब्बल ९३ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. चीनकडून सलग करण्यात आलेली ही सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. चीनकडून तैवानविरोधात सुरू असलेल्या कारवायांची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. चीनचे तैवानवरील संभाव्य आक्रमण उधळून लावण्यास अमेरिका सक्षम आहे, असे उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांनी बजावले आहे.
शुक्रवारी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा ७२ वा स्थापना दिवस होता. या पार्श्वभूमीवर तैवानवरील दडपण वाढविण्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची व्याप्ती वाढविल्याचे दिसत आहे. शुक्रवारी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या २५ विमानांनी सकाळी तर १३ विमानांनी संध्याकाळी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. त्यानंतर शनिवारी ‘पीएलए’च्या तब्बल ३९ विमानांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले.
त्यात सकाळी २० तर संध्याकाळी १९ विमानांनी केलेल्या घुसखोरीचा समावेश होता, अशी माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. शनिवारी घुसखोरी करणार्या विमानांमध्ये दोन ‘वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’सह ‘जे-१६ फायटर जेट्स’(२६), ‘एसयु-३० जेट्स’(१०) व ‘केजे-५०० अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट’चा समावेश होता. या विमानांव्यतिरिक्त ‘ऑर्किड आयलंड’जवळ चीनच्या रिसर्च शिपच्या हालचाली दिसल्याची माहितीही तैवान सरकारकडून देण्यात आली आहे.
रविवारी ३ ऑक्टोबरला सलग तिसर्या दिवशी ‘पीएलए’च्या १६ विमानांनी सकाळी तैवानच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी केल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यात, दोन ‘वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’सह ‘जे-१६ फायटर जेट्स’(८), ‘एसयु-३० जेट्स’(४) व दोन ‘केजे-५०० अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्टस्’ सामील होती, अशी माहिती समोर आली आहे. सकाळच्या या घुसखोरीनंतर चिनी विमाने पुन्हा संध्याकाळी घुसखोरी करण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरी करणार्या चिनी विमानांची संख्या वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
शुक्रवारपासून पुढच्या ७२ तासांमध्ये चीनच्या तब्बल ९३ विमानांनी तैवानच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळ व संध्याकाळी वेगवेगळ्या लष्करी युनिटमधील विमानांनी घुसखोरी केल्याचे समोर आले. यातून चीनने आपली ‘जॉईंट कॉम्बॅट कॅपॅबिलिटी’ दाखवून दिल्याचा दावा तैवानमधील विश्लेषक करीत आहेत. तैवाननजिक चाललेल्या चीनच्या या हालचालींची अमेरिकेनेही गंभीर दखल घेतली.
‘तैवानच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या घटनांवर अमेरिकेचा संरक्षण विभाग लक्ष ठेऊन आहे. तैवानवरील चीनचे संभाव्य आक्रमण हा मुद्दा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गांभीर्याने घेतला आहे. चीनने आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याच्या जोरावर अशा प्रकारच्या मोहिमेसाठी हालचाली केल्या त्या रोखण्यास अमेरिका सक्षम आहे’, असे अमेरिकेच्या उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांनी बजावले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनीही चिनी विमानांच्या घुसखोरीवर प्रतिक्रिया दिली असून, चीनच्या हालचाली चिथावणीखोर व स्थैर्याला धक्का देणार्या असल्याची टीका केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |