वॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडे अधिक प्रगत हायपरसोनिक तंत्रज्ञान असून त्या बळावर चीन अमेरिकेवर अनपेक्षित अणुहल्ला चढवू शकतो, असा गंभीर इशारा अमेरिकेचे संरक्षणदल उपप्रमुख जनरल जॉन हायटन यांनी दिला. चीनने जुलै व ऑगस्ट महिन्यात केलेल्या आण्विक क्षमता असणार्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने ध्वनीच्या पाच पट वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास केला होता, अशी कबुलीही जनरल हायटन यांनी दिली. यावेळी अमेरिकी अधिकार्यांनी चीनच्या चाचणीची तुलना ‘स्पुटनिक मुमेन्ट’शी करून ही बाब अमेरिकेने अतिशय गांभीर्याने घ्यायला हवी, असे आवाहनही केले.
अमेरिकेतील ‘सीबीएस न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जनरल हायटन यांनी, चीनच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत महत्त्वाची माहिती उघड केली. ‘चाचणीसाठी चीनने दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर केला. हे क्षेपणास्त्र पृथ्वीला पूर्ण वळसा घालून पुन्हा चीनमध्ये आले. चीनवर आल्यानंतर या क्षेपणास्त्राने आपल्याकडील हायपसोनिक ग्लाईड व्हेईकल सोडून दिले व त्याने नियोजित लक्ष्याच्या दिशेन प्रवास केला. या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने ध्वनीच्या पाच पट वेगाहून अधिक वेगाचा टप्पा गाठला’, असे अमेरिकेचे संरक्षणदल उपप्रमुख जनरल जॉन हायटन यांनी सांगितले.
‘चीनच्या चाचणीदरम्यान हायपरसोनिक क्षेपणास्त्र नियोजित लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. ही जवळ पोहोचण्याची बाब म्हणजे स्पुटनिक मुमेन्टच होती. तंत्रज्ञानाच्या दृष्टिने चीनची चाचणी अत्यंत प्रगत व प्रभावी ठरली. स्पुटनिकच्या घटनेनंतर अमेरिकेने अतिशय तातडीने व वेगाने पावले उचलली होती. मात्र चीनने २७ जूनला केलेल्या चाचणीनंतर अमेरिकेत असे काही घडले नाही’, असा दावाही जनरल हायटन यांनी केला. ही बाब फारशी चांगली नसून अमेरिकी प्रशासनाने चीनची चाचणी अत्यंत गांभीर्याने घेऊन पुढे पावले उचलायला हवीत, असा सल्लाही हायटन यांनी दिला.
चाचण्यांदरम्यान चीनने वापरलेले क्षेपणास्त्र हे ‘फर्स्ट युज वेपन’ प्रकारातील होते आणि त्याचा वापर करून भविष्यात चीन अमेरिकेवर अनपेक्षितरित्या अणुहल्ला चढवू शकतो, असा गंभीर इशारा संरक्षणदल उपप्रमुख जनरल हायटन यांनी दिला. अमेरिकाही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित करीत असली तरी त्याची गती चीनच्या तुलनेत मंद असल्याचेही जनरल हायटन यांनी म्हटले आहे. जनरल हायटन यांच्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनीही, चीनने केलेली हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी ही ‘स्पुटनिक’शी तुलना होईल, अशी धक्कादायक घटना असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जनरल हायटन यांनीही त्याचा उल्लेख करून चीनच्या संभाव्य अणुहल्ल्याकडेही लक्ष वेधले आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ने चीनने आण्विक क्षमता असलेल्या हायपसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. चाचणीदरम्यान चिनी क्षेपणास्त्राने पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून (लो ऑर्बिट) प्रवास केल्याचे सदर वृत्तात सांगण्यात आले होते. ही चाचणी चीनच्या हायपरसोनिक क्षमतेबरोबरच अंतराळातील क्षमताही दाखवून देणारी ठरते, असाही दावा करण्यात आला होता. त्यानंतर दुसर्या चाचणीची माहितीही समोर आली होती. दोन्ही चाचण्या अमेरिकी यंत्रणांना सुगावा लागू न देता झाल्याचे व चिनी क्षेपणास्त्रांनी दाखविलेली क्षमता अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना चकित करणारी ठरल्याचे म्हटले जाते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |