बेलारुस निर्वासितांचा ‘लिव्हिंग वेपन’ म्हणून वापर करीत आहे – पोलंडचा आरोप

बेलारुस

वॉर्सा/मिन्स्क – ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूला आश्रय दिल्याचा सूड उगविण्यासाठी बेलारुस निर्वासितांचा जिवंत शस्त्रासारखा वापर करून त्यांना पोलंडमध्ये घुसवित आहे, असा खळबळजनक आरोप पोलंडने केला आहे. निर्वासितांच्या माध्यमातून बेलारुस युरोपिय महासंघाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ खेळत असल्याचा इशाराही यावेळी पोलंडने दिला. पोलंडच्या आधी लिथुआनियानेही बेलारुसवर निर्वासितांच्या घुसखोरीबाबत गंभीर आरोप केले होते. पोलंड व लिथुआनियाने यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी केले असून, युरोपिय महासंघाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिस्तसिना त्सिमानोस्काया या बेलारुसच्या महिला धावपटूने पोलंडच्या दूतावासात प्रवेश करून खळबळ उडवली होती. या घटनेनंतर पोलंड सरकारने क्रिस्तसिनाला मानवतावादी भूमिकेतून आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेवर बेलारुसने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. सदर घटनेनंतर बेलारुस-पोलंड सीमेवरील निर्वासितांचे लोंढे वाढण्यास सुरुवात झाल्याचा दावा पोलंडकडून करण्यात आला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/belarus-is-using-refugees-as-living-weapons/