टोकिओ/कॅनबेरा – चीनच्या वाढत्या आक्रमक व वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी जपान व ऑस्ट्रेलियामध्ये व्यापक संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्य करार करण्यात येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या व्हर्च्युअल बैठकीत यावर स्वाक्षऱ्या होतील, अशी माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली. गेल्या सात महिन्यात दोन देशांमध्ये होणारा हा दुसरा संरक्षण करार आहे. यापूर्वी जून महिन्यात दोन देशांच्या हवाईदलांमध्ये ‘इंटरऑपरेबिलिटी डील`वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. जपान व ऑस्ट्रेलियामधील हे वाढते सहकार्य म्हणजे चीनला दिलेला संदेश असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या माजी संरक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे.
गुरुवारी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन ‘रेसिप्रोकल ॲक्सेस ॲग्रीमेंट`वर स्वाक्षऱ्या करतील. या करारानुसार, जपान व ऑस्ट्रेलियाची संरक्षणदले परस्परांच्या संरक्षणतळांचा वापर करु शकणार आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षणसरावांची संख्या तसेच व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. जपानच्या युद्धनौका व लढाऊ विमाने ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्रात तसेच ऑस्ट्रेलियन युद्धनौका व लढाऊ विमाने जपानच्या क्षेत्रात तैनात करणे शक्य होणार आहे.
चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर जपान व ऑस्ट्रेलियामधील नवा करार लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. ‘दोन्ही देशांसमोर असणारी सुरक्षाविषयक आव्हाने व स्थिर इंडो-पॅसिफिकसाठी उचलण्यात येणारी पावले या पार्श्वभूमीवर नवा करार ऑस्ट्रेलिया व जपानने दिलेला ठाम संदेश ठरतो`, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कराराचे महत्त्व अधोरेखित केले.
जपान व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही चीनचे आघाडीचे व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतात. काही दिवसांपूर्वी चीनच्ा पुढाकाराने करण्यात आलेल्या ‘आरसीईपी` या व्यापारी करारात जपान व ऑस्ट्रेलियाचा सहभाग आहे. मात्र असे असले तरी चीनकडून गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या कारवायांबाबत दोन्ही देशांनी सातत्याने आवाज उठवून आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या ‘क्वाड`मध्ये दोन्ही देशांचा सहभाग असून ‘टू प्लस टू डायलॉग`ही सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियानजिक पार पडलेल्या व्यापक संरक्षणसरावात जपान सहभागी झाला होता.
गेल्या शतकात झालेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपानबरोबर व्यापक संरक्षण सहकार्य करार केला होता. त्यानुसार, अमेरिकेने जपानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. असे असतानाही चीनच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास जपान तयार नसून, ऑस्ट्रेलियाबरोबरील संरक्षण करार त्याचे स्पष्ट संकेत ठरतात.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |