लंडन/मॉस्को – समुद्राच्या तळाशी टाकलेल्या ‘अंडरसी केबल्स` ही जगातील खरी ‘इन्फोर्मेशन सिस्टिम` असून रशियाने या केबल्स तोडण्याचा अथवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास ती युद्धासाठी दिलेली चिथावणी मानली जाईल, असा खरमरीत इशारा ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला. ॲडमिरल सर टोनी रॅडाकिन यांनी यावेळी ब्रिटननजिकच्या सागरी क्षेत्रात रशियन पाणबुड्यांच्या हालचाली वाढल्याकडेही लक्ष वेधले. यावेळी त्यांनी वर्षभरापूर्वी ब्रिटीश युद्धनौका व रशियन पाणबुडीमध्ये झालेल्या टकरीचाही उल्लेख केला.
गेल्या काही वर्षात ब्रिटन व रशियामधील संबंधांमध्ये सातत्याने खटके उडत असल्याचे दिसत आहे. 2014 साली क्रिमिआवर मिळविलेला ताबा, ‘ब्रेक्झिट`मधील हस्तक्षेप तसेच ब्रिटनमधील माजी रशियन अधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे दोन देशांमधील तणाव चांगलाच चिघळला आहे. ब्रिटनवर होणाऱ्या सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचे दावेही समोर आले आहेत. याच कालावधीत रशिया व नाटोमधील तणावही वाढला असून नाटो सदस्य देशांवर दडपण वाढविण्यासाठी रशियन युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमाने सातत्याने धडकत आहेत.
डिसेंबर 2020मध्ये 15 दिवसांच्या अवधीत नऊ रशियन युद्धनौका व पाणबुड्या ब्रिटनच्या सागरी क्षेत्रानजिक आढळल्या होत्या. याच महिन्यात ब्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस नॉर्थंबरलॅण्ड` व रशियन पाणबुडीची टक्कर झाली होती. या घटनेने ब्रिटनमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख ॲडमिरल सर टोनी रॅडाकिन यांनी पुढील काळात अशा घटना अधिक गांभीर्याने घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये रशियन पाणबुड्यांचा वावर व इतर ‘अंडरवॉटर ॲक्टिव्हिटी`मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याकडे लक्ष वेधले.
‘सागरी तळाशी असणऱ्या इंटरनेट केबल्स ही जगाची खरी इन्फोर्मेशन सिस्टिम आहे. रशियाच्या हालचाली या यंत्रणेला धक्का पोहोचविणाऱ्या ठरु शकतात. यासंदर्भातील क्षमता रशियाने वाढविली आहे. रशियाकडून इंटरनेट केबल्सना धक्का पोहोचविण्याची आगळीक घडल्यास ते युद्धाला चिथावणी देणारे कृत्य मानले जाईल व त्यानुसार ब्रिटन त्याला प्रत्युत्तर देईल`, असा इशारा संरक्षणदलप्रमुखांनी दिला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |