इस्रायलच्या पंतप्रधानांचा इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्णायक इशारा

न्यूयॉर्क – ‘इराणचा अणुकार्यक्रम निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून त्याबरोबर इस्रायलचा संयमही संपुष्टात आला आहे. पोकळ शब्दांनी अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्युजेसचे संवर्धन थांबविता येणार नाही. पण काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही’, अशा निर्णायक शब्दात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी इराणसह आंतरराष्ट्रीय समुदायालाही इशारा दिला. इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणवर कारवाईचे संकेत दिल्याचा दावा इस्रायली तसेच पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. इस्रायली पंतप्रधानांचे भाषण खोट्या आरोपांवर आधारलेले होते आणि इस्रायलला इराणद्वेषाने पछाडले आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त-रवांची यांनी केली.

निर्णायक इशारा

संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या पहिल्या भाषणात इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणचा अणुकार्यक्रम तसेच इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्ला, हमास, हौथी, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचा उल्लेख केला. ‘आण्विक धाक दाखवून इराणला या क्षेत्रावर वर्चस्व गाजवायचे आहे व गेल्या तीन दशकांपासून इराण याप्रकारे या क्षेत्राचा विनाश करीत आहे. लेबेनॉन, इराक, सिरिया, येमेन आणि गाझा यांच्या विनाशासाठी इराण जबाबदार आहे’, असा आरोप बेनेट यांनी केला. इराणचे नेते ज्या देशाला स्पर्श करतात, तो देश बरबाद होतो, असा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.

तर इराणचे राष्ट्रध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या भूतकाळाची आठवण पंतप्रधान बेनेट यांनी राष्ट्रसंघाला करुन दिली. १९८८ साली इराणच्या राजवटीने सुमारे पाच हजार राजकीय विरोधकांच्या सामुहिक हत्येचे आदेश दिले होते. या राजकीय विरोधकांना क्रेनला लटकावून फासावर चढविले होते. या भीषण हत्याकांडाचे आदेश देणार्‍यांमध्ये इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रईसी आघाडीवर होते, याकडे पंतप्रधान बेनेट यांनी लक्ष वेधले. यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणचा अणुकार्यक्रम आणि त्यासंबंधी समोर येणार्‍या माहितीवर ताशेरे ओढले. ‘इराणचा अणुकार्यक्रम सध्या गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. या अणुकार्यक्रमाअंतर्गत इराणने सर्व मर्यादांचे उल्लंघन केले असून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना परवानगी नाकारली, त्यांचा छळ केला. त्यामुळे इराणकडे अपेक्षेने पाहणारे तोंडघशी पडले आहेत’, असा घणाघात पंतप्रधान बेनेट यांनी केला. इराण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे सर्व नियम मोडले व युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवल्याची टीका इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली. राजधानी तेहरानसह तुरकूझाबाद, मारेवान येथे छुपे अणुप्रकल्प सुरू करून इराणने अणुबॉम्ब निर्मितीबाबतचे आपले इरादे स्पष्ट केल्याचा ठपका पंतप्रधान बेनेट यांनी ठेवला.

काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रनिर्मिती करू देणार नसल्याचे बेनेट यांनी ठणकावून सांगितले. तसेच इराणबरोबरचा २०१५ सालचा अणुकरार नव्याने लागू करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पाश्‍चिमात्य देशांवर टीका केली. इराणला रोखण्यासाठी आपण गांभीर्याने प्रयत्न केले तर त्यामध्ये नक्कीच यश मिळू शकते, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी जीनिव्हा येथे सुरू असलेल्या वाटाघाटींवर सवाल उपस्थित केला. यानंतर अमेरिकेतील ज्यूधर्मियांबरोबर इस्रायलला नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे पंतप्रधान बेनेट एका कार्यक्रमात म्हणाले.

दरम्यान, इस्रायली पंतप्रधानांच्या या इशार्‍यावर इराणने टीका केली. शेकडो अण्वस्त्रे ताफ्यात असलेला इस्रायल इराणच्या शांतीपूर्ण अणुकार्यक्रमावर खोटे आरोप करीत असल्याचा दावा इराणचे राजदूत रवांनी यांनी केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info