एव्हरग्रॅन्ड क्रायसिस, वीजटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली

‘वर्ल्ड बँके’सह प्रमुख वित्तसंस्थांचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘एव्हरग्रॅन्ड’ कंपनीवरील दिवाळखोरीचे संकट व वीजेच्या टंचाईमुळे मंदावलेले उत्पादन या पार्श्‍वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. वर्ल्ड बँकेसह गोल्डमॅन सॅक्स व नोमुरा या आघाडीच्या वित्तसंस्थांनी याबाबत भाकित वर्तविल्याचे समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणार्‍या धक्क्यांबाबत दावे करत असताना चिनी माध्यमांनी उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने चिनी नाही तर अमेरिकी अर्थव्यवस्था संकटात असल्याचा टोला लगावला आहे.

घसरण

या वर्षाच्या सुरुवातीलाच, चीनमधील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढत असून खाजगी क्षेत्राची पतही घसरू लागल्याचे समोर आले होते. मात्र कर्जाचा बोजा व त्याच्याशी निगडीत धोके कमी करण्यासाठी चीनच्या राजवटीने कोणतीही पावले उचलल्याचे दिसत नाही. उलट गेल्या काही महिन्यात चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट खाजगी उद्योगांवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नवे कठोर नियम लागू करण्यात आले असून बँकांना कर्जांचे मनमानी वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याचे तीव्र परिणाम समोर येत असून रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट त्याचाच भाग मानला जातो. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सचे कर्ज असून आपले कर्जाचे हप्ते चुकविण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळे चीनसह आशिया, युरोप व अमेरिकेतील शेअरबाजारांना मोठा फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही धक्का बसला असून त्याचे पडसाद पोलाद व इतर क्षेत्रांना बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचवेळी चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रांतांना वीजटंचाईचा फटका बसत असून अनेक परदेशी तसेच देशी कारखाने बंद करणे भाग पडले आहे. त्याचा फटका उत्पादन क्षेत्राला बसला असून चीनसह जागतिक पातळीवरील काही बड्या कंपन्यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीची भाकिते करण्यास सुरुवात केली आहे.

घसरण

अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’सह आघाडीच्या माध्यमांनी विश्‍लेषक व अर्थततज्ज्ञांचा हवाला देऊन वीजटंचाईचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसेल, असा दावा केला आहे. त्यापाठोपाठ ‘नोमुरा’ या आघाडीच्या वित्तसंस्थेने चीनच्या विकासदरात ०.५ टक्क्यांची घसरण होण्याचे भाकित वर्तविले आहे. अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था ‘गोल्डमन सॅक्स’नेही चीनचा जीडीपी ०.४ टक्क्यांनी घसरण्याचा दावा केला आहे.

‘वर्ल्ड बँके’च्या अहवालात चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा दावा केला असला तरी या प्रक्रियेत धक्के बसू शकतात, असे म्हटले आहे. चीनच्या विकासदराच्या वाढीचा वेग मंदावल्याचेही ‘वर्ल्ड बँके’ने म्हटले आहे. विविध वित्तसंस्थांचे दावे समोर येत असतानाच चीनच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात घसरण झाल्याची माहितीही समोर आली आहे. सलग सहा महिने कंपन्यांच्या नफ्यात घट होत असून जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सहा टक्क्यांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, वीजटंचाई व कोरोनाचे लॉकडाऊन यामुळे नफ्यात सातत्याने घसरण सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसण्यासंदर्भात करण्यात येत असलेली भाकिते अतिशयोक्तपूर्ण असल्याची बोंब चिनी प्रसारमाध्यमांकडून मारण्यात आली आहे. सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीची वेळ येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री व इतर अभ्यासगटांकडून कर्जाच्या मर्यादेवरून देण्यात आलेल्या इशार्‍यांचा हवाला यासाठी देण्यात आला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेशी निगडीत विधेयकांवरून संसदेत सुरू असणार्‍या राजकीय संघर्षाचा उल्लेखही चिनी दैनिकाने केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info