राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चीन दौर्‍यात रशिया व चीनदरम्यान दीर्घकालिन इंधनकरारावर स्वाक्षर्‍या

इंधनकरारावर स्वाक्षर्‍या

मॉस्को/बीजिंग – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन चीन दौर्‍यावर असतानाच दोन देशांमध्ये दीर्घकालिन इंधनकरारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. रशियाची आघाडीची इंधनकंपनी ‘गाझप्रोम’ने यासंदर्भात माहिती दिली. या करारानुसार, रशिया पुढील ३० वर्षे चीनला १० अब्ज घनमीटर अतिरिक्त नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा करणार आहे. दोन देशांमध्ये झालेला हा दुसरा दीर्घकालिन इंधनकरार ठरला आहे.

रशियाची आघाडीची इंधनकंपनी ‘गाझप्रोम’ व चीनची सरकारी इंधनकंपनी ‘सीएनपीसी’ यांच्यात इंधनकरारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. या करारानुसार, रशिया सैबेरियातील इंधनक्षेत्रातून चीनला १० अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविणार आहे. या कराराची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर रशियाकडून अतिपूर्व भागात चीनला पुरविण्यात येणार्‍या इंधनाचे प्रमाण ४८ अब्ज घनमीटरपर्यंत वाढेल, अशी माहिती रशियन सूत्रांनी दिली. शुक्रवारी झालेल्या करारात इंधनाच्या व्यवहारासाठी युरोचा वापर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

इंधनकरारावर स्वाक्षर्‍या

रशिया व चीनमध्ये गेल्या दशकभरात पार पडलेला हा दुसरा दीर्घकालिन इंधनकरार ठरला आहे. यापूर्वी २०१४ साली रशिया व चीनमध्ये ३० वर्षांसाठी इंधनकरार करण्यात आला होता. या करारानुसार, २०१९ साली रशियाच्या ‘पॉवर ऑफ सैबेरिया’ या इंधनवाहिनीतून चीनला नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा सुरू झाला होता. त्यानंतर २०१५ साली रशियाच्या वेस्टर्न इंधनवाहिनीतूनही चीनला इंधनपुरवठा करण्याचा करार करण्यात आला. पण हा करार मर्यादित स्वरुपाचा असल्याचे सांगण्यात आले होते.

इंधनकरारावर स्वाक्षर्‍या

मात्र शुक्रवारी झालेला नवा करार दोन देशांमधील इंधनसहकार्य अधिक मजबूत करणारा ठरला आहे. नव्या करारामुळे रशियाल नैसर्गिक इंधनवायुच्या पुरवठ्यासाठी नवा मार्ग उपलब्ध झाला असून युरोपिय देशांसाठी ही बाब चिंतेची ठरु शकते. रशियाकडून युरोपच्या गरजेपैकी ३० टक्क्यांहून अधिक इंधनपुरवठा करण्यात येतो. मात्र युक्रेनमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने युरोपला पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. हे पर्याय सक्रिय झाल्यास युरोपिय देश रशियाकडून घेण्यात येणार्‍या इंधनाचे प्रमाण कमी करतील व रशियाला त्याचा फटका बसेल, असे मानले जाते. पण चीनशी दीर्घकालिन करार करून रशियाने अमेरिका व युरोपच्या हालचालींना शह दिल्याचे मानले जाते.

रशियाकडून इंधनाची आयात करीत असतानाच चीनने युक्रेन मुद्यावर रशियाला समर्थन दिल्याचेही समोर आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात नाटोच्या युरोपातील विस्ताराला विरोध करण्यात आला असून शीतयुद्धकालिन मानसिकतेतून नाटोने बाहेर पडावे, असा उल्लेख करण्यात आला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info