अमेरिकेसमोर चीन व रशिया या अण्वस्त्रसज्ज देशांचे आव्हान

- अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘आजच्या घडीला अमेरिकेसमोर दोन अण्वस्त्रसज्ज देशांचे आव्हान आहे. हे देश जगभरात कोणत्याही क्षेत्रात एकट्याने संघर्षाचा भडका उडवून देऊ शकतात व त्यासाठी त्यांच्या सामर्थ्याचा भाग असलेल्या कोणत्याही साधनाचा वापर करु शकतात. इतिहासात कधीच अमेरिकेपुढे असे आव्हान उभे राहिले नव्हते’, अशा शब्दात अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे प्रमुख ऍडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी चीन व रशियाकडून असलेल्या वाढत्या आण्विक धोक्याबाबत इशारा दिला.

अण्वस्त्रसज्ज

अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर सध्या संरक्षणधोरण व खर्चाच्या मुद्यावर सुनावणी सुरू आहे. यावेळी अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’ तसेच ‘स्पेस कमांड’च्या प्रमुखांनी रशिया व चीनच्या वाढत्या सहकार्यातून निर्माण होणार्‍या आव्हानांचा उल्लेख केला. ‘संधी साधून व परस्परांच्या सहकार्याने केलेले आक्रमण तीव्र चिंतेचा मुद्दा ठरतो. चीन व रशियाच्या आण्विक क्षमता आणि त्याची व्याप्ती नक्की कोणत्या स्तरापर्यंत आहे, याची अमेरिकेला कल्पना नाही’, असे ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे प्रमुख ऍडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी बजावले.

यापूर्वी अमेरिकेला फक्त रशियाच्या अण्वस्त्रसज्जतेचा विचार करून धोरण आखण्याची गरज होती. मात्र आता ‘थ्री पार्टी स्टेबिलिटी’चा विचार करून पावले उचलावी लागणार आहेत, याकडे ऍडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी लक्ष वेधले. आपल्या सुनावणीत ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांनी अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर ट्रायड’च्या आधुनिकीकरणाचा मुद्दाही उपस्थित केला. चीन व रशियाच्या वाढत्या धोक्याचा विचार करता अमेरिकेने आपल्या ‘न्यूक्लिअर ट्रायड’मधील बदलांसाठी वेगाने पावले उचलायला हवीत, असे आवाहन ऍडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी केले.

अण्वस्त्रसज्ज

अमेरिकेच्या स्पेस कमांडचे प्रमुख जनरल जेम्स डिकिन्सन यांनी, चीन व रशियाने अंतराळक्षेत्रात मारलेली मुसंडी आणि त्यांच्यातील वाढत्या सहकार्यावर चिंता व्यक्त केली. अंतराळक्षेत्र हे आता अमेरिकेसाठी सुरक्षित आश्रयस्थान राहिलेले नाही, असा दावाही त्यांनी केला. अमेरिका व रशियाकडून अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास चीनने नकार दिला आहे. अमेरिका व रशियाकडे सध्या जगातील ९० टक्के अण्वस्त्रे आहेत आणि त्यांनी आपल्या अण्वस्त्रांचा साठा चीनइतका कमी केला तर चीन अण्वस्त्रे कमी करण्याबाबतच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होईल, अशी भूमिका चीनने घेतली आहे. गेल्या वर्षी अमेरिका तसेच युरोपमधील आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीनकडे ३५० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या दशकाच्या अखेरपर्यंत चीन त्यांचा अण्वस्त्रसाठा हजारपर्यंत नेईल, असा दावा करण्यात आला असून त्यासाठी वेगाने तयारी सुरू असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info