युएई, सौदीवर हौथी बंडखोरांचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले

दुबई/रियाध/सना – सोमवारी पहाटे येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएई आणि सौदी अरेबियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. युएईच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने राजधानी अबू धाबीवरील क्षेपणास्त्रांचे हे हल्ल्ले भेदले. तर सौदीच्या जझान शहरावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. यानंतर हौथी बंडखोरांनी युएई व सौदीवरील हल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युएईतील प्रमुख शहरांबरोबर लष्करी तळावर तैनात अमेरिका, फ्रान्सचे जवान आपल्या निशाण्यावर असल्याची धमकी हौथी बंडखोरांनी दिली.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास युएईची राजधानी अबू धाबीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. आठवड्याभरात राजधानी अबू धाबीला लक्ष्य करून हौथींनी चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो. गेल्या आठवड्यातील हल्ल्यात तीन परदेशी नागरिकांचा बळी गेला होता. पण सोमवारचे क्षेपणास्त्र हल्ले युएईच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदले. या कारवाईत नष्ट झालेल्या क्षेपणास्त्रांचे तुकडे अबू धाबी शहरातील काही भागात कोसळले.

याच सुमारास सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील जझान आणि धाहरान अल-जनूब या दोन शहरांवर हौथींनी क्षेपणास्त्रे डागली. यापैकी धाहरान शहराच्या दिशेने येणार्‍या क्षेपणास्त्राच्या ठिकर्‍या उडविण्यात सौदीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला यश मिळाले. पण जझान शहरावर कोसळलेल्या क्षेपणास्त्रामुळे दोन परदेशी नागरिक जखमी झाले. यामध्ये एक बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढच्या काही मिनिटांमध्ये युएईने ‘एफ-१६’ लढाऊ विमाने रवाना करून येमेनमधील ‘अल-जाव्फ’ या हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या शहरावर हल्ले चढविले. या शहरातूनच बंडखोरांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली होती. येथील हौथींचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा युएईच्या यंत्रणेने केला. युएईने हौथी बंडखोरांच्या ठिकाणावरील कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यानंतर हौथी बंडखोरांनी युएई व सौदी अरेबियाला नव्या हल्ल्यांचा इशारा दिला.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले

‘आम्ही येत्या काळात हवाई कारवाईची तीव्रता वाढविण्यासाठी आणि प्रत्युत्तराद्वारे उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत’, अशी घोषणा हौथी बंडखोरांचा प्रवक्ता याह्या सरी याने केली. त्याचबरोबर सोमवारी पहाटे युएईची राजधानी अबू धाबीसह दुबईवर देखील आपण बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती बंडखोरांच्या प्रवक्त्याने दिली. तर अबू धाबीच्या अल धाफ्रा हवाईतळ आपल्या निशाण्यावर होते. या तळावर युएईच्या लष्कराबरोबर अमेरिका आणि फ्रान्सचे जवान देखील तैनात आहेत. त्यामुळे हौथी बंडखोर अबू धाबीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून मोठे नुकसान करण्याची तयारी करीत असल्याचे दिसत आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांच्या अल ज्वाफ येथील लष्करी तळापासून युएईची राजधानी अबू धाबी जवळपास १,५०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हौथी बंडखोरांकडे १,५०० व त्याहून अधिक अंतरापर्यंत मारा करणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हौथी बंडखोरांच्या ताफ्यात असल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. हौथी बंडखोरांनी चढविलेल्या या हल्ल्यांवर अरब लीगने जोरदार टीका केली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात युएई व सोमवारी सौदी अरेबियावरील हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय माध्यमे अमेरिकन हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. या दोन्ही अरब देशांनी अमेरिकेकडून प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केली होती. पण गेल्या काही महिन्यांमध्ये सदर यंत्रणा हौथींचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले भेदण्यात अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. यामुळे अरब मित्रदेशांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे आखातातील लष्करी विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info