युक्रेन नाटोचा सदस्य बनू शकत नाही

- भीषण विध्वंसानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना जाणीव झाली

किव्ह – २१ दिवसांच्या घनघोर युद्धात युक्रेनची दुर्दशा उडाल्यानंतर, युक्रेन नाटोत सहभागी होऊ शकत नाही, याची जाणीव या देशाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना झालेली आहे. नाटोच्या सदस्यत्त्वाबाबतचे हे वास्तव समोर येत असताना, युरोपिय महासंघाने देखील युक्रेनला सदस्य म्हणून मान्यता देण्यास बराच वेळ लागेल, असे जाहीर केले आहे. यामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नक्की कशासाठी रशियाबरोबरील हे युद्ध ओढावून घेतले, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

रशिया व युक्रेनमध्ये संघर्षबंदीसाठी नव्याने चर्चा सुरू होत आहे. मात्र ही चर्चेची प्रक्रिया सुरू असताना देखील रशियाने युक्रेनच्या शहरांवर घणाघाती हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनच्या शहरांमधील इमारती रशियाच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त होत असून नागरी भागांचेही अतोनात नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी युक्रेनच्या लष्कराने केलेल्या प्रतिकारामुळे रशियाचे रणगाडे व लष्करी वाहने नष्ट झाल्याचे व्हिडिओज् प्रसिद्ध केले जात आहेत. असे असले तरी युक्रेनी लष्कराचा प्रतिकार संघटीत नसल्याचे दावे लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीतही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोला या संघर्षात उतरण्याचे आवाहन केले.

निदान स्वतःच्या रक्षणासाठी तरी आम्हाला सहाय्य करा, कारण युक्रेननंतर रशिया नाटोलाच लक्ष्य करील, असे दावे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले. त्याचवेळी आपल्या देशाला नाटोचे सदस्यत्त्व मिळेल, याची आशा झेलेन्स्की यांनी सोडून दिल्याचे त्यांच विधानांवरून स्पष्ट होत आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊन आपली सुरक्षा धोक्यात आणू नये, याची हमी रशियाने युक्रेन तसेच नाटोकडे मागितली होती. पण त्याला युक्रेन आणि नाटोने देखील नकार दिला होता. पण आज युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नाही, असे मान्य करीत आहे. ही बाब त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी मान्य केली असती, तर कदाचित युक्रेनवरील रशियाचा हल्ला टळू शकला असता.

२१ दिवसांच्या या संघर्षात ६१९ नागरिक ठार झाले असून जखमींची संख्या १,१४३वर गेली आहे. तर या युद्धामुळे ३२ लाखाहून अधिक युक्रेनी बेघर बनले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने दिली. तर युक्रेनचे सरकार मात्र या संघर्षात याहून कितीतरी अधिक पट जीवितहानी झाल्याचे सांगत आहे.

अमेरिका आणि नाटोने दिलेल्या आश्‍वासनावर भिस्त ठेवून युक्रेनने रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. नाटोचे सदस्यत्त्व युक्रेनने स्वीकारायचे की नाही, याचा निर्णय युक्रेनची जनता घेईल, अशी आदर्शवादी भूमिका त्यावेळी युक्रेन, अमेरिका आणि नाटोने घेतली होती. पण युद्ध पेटल्यानंतर, युक्रेन अजूनही नाटोचा सदस्य बनलेला नाही, याची आठवण अमेरिकेने करून दिली व रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेनसाठी या युद्धात उतरण्यास आपण तयार नसल्याचे अमेरिकेने जाहीर केले.

ऐनवेळी अमेरिकेने केलेल्या या अवसानघातामुळे युक्रेन बलाढ्य रशियाच्या आक्रमणासमोर एकाकी पडला. रशियन सैन्यासमोर युक्रेनचा प्रतिकार तोकडा पडत असल्याचे दिसते आहे. पुढच्या काळात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होऊन संघर्षबंदी झाली, तरच युक्रेनची यापुढील हानी टाळता येऊ शकेल. अन्यथा रशिया संपूर्णपणे युक्रेनचा ताबा घेईपर्यंत या देशातील सारे काही बेचिराख झालेले असण्याची भयंकर शक्यता समोर येत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info