दक्षिण कोरिया-अमेरिका युद्धसराव म्हणजे आक्रमणाची रिहर्सल

उत्तर कोरियाकडून ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ क्षमता वाढविण्याचा इशारा

प्योनग्यँग/सेऊल – उत्तर कोरियाने यापूर्वी दिलेल्या इशार्‍यांनंतरही दक्षिण कोरियाने अमेरिकेबरोबर सराव करण्याचा निर्णय कायम ठेवला असून, हा सराव म्हणजे आक्रमणाची रिहर्सल असल्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. हा सराव अमेरिकेकडून उत्तर कोरियाला असणार्‍या वाढत्या लष्करी धोक्याचे संकेत असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर कोरिया आपली ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ची क्षमता अधिक वाढवेल, असेही उत्तर कोरियाने बजावले. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांची बहीण किम यो जॉंग यांनी ही धमकी दिली आहे. अवघ्या आठवड्याभरात किम यो जॉंग यांनी दक्षिण कोरियाला धमकावण्याची ही दुसरी वेळ आहे.

आक्रमणाची रिहर्सल

गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तर कोरियाने दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी स्थापन केलेले राजनैतिक कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन देशांमधील संपर्क तोडून लष्करी व आण्विक हालचालींना वेग दिला होता. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांनी चीनबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. या सर्व हालचाली दक्षिण कोरिया व अमेरिकेवर दडपण आणण्यासाठी असल्याचे सांगण्यात येते. दडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी उत्तर व दक्षिण कोरियाने पुन्हा परस्परांमधील संपर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र असे असले तरी अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये होणार्‍या युद्धसरावाच्या मुद्यावर उत्तर कोरियाने आपली भूमिका बदलली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात किम यो जॉंग यांनी, चिथावणी देणारा युद्धसराव व धाडसी निर्णय यापैकी दक्षिण कोरिया कोणता पर्याय निवडते यावर उत्तर कोरियाचे सरकार व लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे, असे बजावले होते. उत्तर कोरियाच्या या धमकीनंतरही अमेरिका व दक्षिण कोरियाने सराव पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे स्पष्ट केले होते. अमेरिका व दक्षिण कोरियाने सरावाबाबतची भूमिका न बदलल्याने उत्तर कोरियाने अधिक आक्रमक भूमिका घेत धमकावल्याचे दिसत आहे.

‘उत्तर कोरियाने दिलेल्या इशार्‍यानंतरही अमेरिकेबरोबरील सराव कायम ठेवण्याचा निर्णय दक्षिण कोरियाचे कपटी धोरण दाखविणारा ठरतो. या अशा धोरणामुळे सुरक्षेला अधिकच गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या सरावातून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचा उत्तर कोरियाबाबतचा दुटप्पीपणाही दिसून येतो’, असे हुकुमशहा किम जॉंग उन यांची बहीण किम यो जॉंग यांनी बजावले. अमेरिकेने दक्षिण कोरियातील सैन्य व शस्त्रास्त्रे काढून घेतल्याशिवाय कोरियन क्षेत्रात शांतता नांदणार नाही, असा इशाराही किम यो जॉंग यांनी दिला.

अमेरिका व दक्षिण कोरियाच्या सरावावर टीका करतानाच उत्तर कोरिया आपली संरक्षणक्षमता वाढवेल, अशी धमकीही त्यांनी दिली. उत्तर कोरियाविरोधातील कोणत्याही लष्करी आक्रमणाला प्रत्युत्तर देता येईल, अशा रितीने जोरदार ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ करण्याची क्षमता अधिक बळकट केली जाईल, असेही किम यो जॉंग यांनी सांगितले. त्याचवेळी अमेरिका व दक्षिण कोरियामधील सराव म्हणजे संबंधित देशांनी त्यांच्या विनाशासाठी केलेली कारवाई ठरेल, अशी धमकीही हुकुमशहा किम जॉंग उन यांच्या बहिणीने दिली.

या धमकावणीनंतर दक्षिण व उत्तर कोरियातील संपर्कासाठी उभारण्यात आलेल्या ‘हॉटलाईन’ला प्रतिसाद देण्याचे उत्तर कोरियाने बंद केल्याची माहिती दक्षिण कोरियाने दिली आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने उत्तर कोरियाच्या इशार्‍यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info