अमेरिका-दक्षिण कोरिया युद्धसरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाकडून सात दिवसात चौथी क्षेपणास्त्र चाचणी

प्योनग्यँग/सेऊल – अमेरिका व दक्षिण कोरियाकडून सुरू असणाऱ्या व्यापक युद्धसरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली. रविवारी सकाळी करण्यात आलेल्या या चाचणीसाठी उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे सांगण्यात येते. ही चाचणी सुरू असतानाच अमेरिका व दक्षिण कोरियाने बॉम्बर विमानांसह युद्धसराव केल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या नव्या चाचणीवर अमेरिकेसह दक्षिण कोरिया व जपानची प्रतिक्रिया उमटली असून सदर चाचणी सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन असल्याची टीका केली आहे.

क्षेपणास्त्र चाचणी

गेल्या सोमवारपासून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्कराला दहा दिवसांचा युद्धसराव सुरू झाला आहे. हा गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठा युद्धसराव असल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. पण अमेरिका व दक्षिण कोरियाचा हा युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाच्या राजवटीकडून करण्यात आला आहे. सदर सराव म्हणजे अणुयुद्धाची चिथावणी असल्याचा ठपका ठेवून उत्तर कोरियाने देखील अमेरिका व दक्षिण कोरियाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. त्याचवेळी या सरावाला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांची मालिकाच सुरू केली आहे.

क्षेपणास्त्र चाचणी

शुक्रवारी 10 मार्च रोजी उत्तर कोरियाने एकाच वेळी सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन खळबळ उडविली होती. त्यानंतरही उत्तर कोरियाने एकामागोमाग एक दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. मात्र त्याचे तपशील समोर आले नव्हते. गेल्या गुरुवारी उत्तर कोरियाच्या लष्कराने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने घेतलेली ही चाचणी सर्वात शक्तिशाली चाचणी असल्याचा दावा विश्लेषक तसेच माध्यमांकडून करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राने एक हजार किलोमीटर अंतराचा पल्ला गाठला होता.

क्षेपणास्त्र चाचणी

गुरुवारच्या चाचणीनंतर आता रविवारी पुन्हा एकदा उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या पश्चिम भागातून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने जवळपास 800 किलोमीटर्सचा पल्ला गाठल्याची माहिती दक्षिण कोरिया व जपानने दिली. सदर क्षेपणास्त्र सी ऑफ जपानमध्ये कोसळल्याचे सांगण्यात येते. या चाचणीनंतर दक्षिण कोरिया व जपानने आपल्या संरक्षणदलांना अलर्टचा इशारा दिला. सकाळी 11च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याचेही समोर आले आहे.

ही चाचणी सुरू असतानाचा दक्षिण कोरियाच्या हद्दीत अमेरिका व दक्षिण कोरियाने व्यापक युद्धसराव केला. अमेरिकेकडून ‘बी-1बी स्ॅटेजिक बॉम्बर’ तसेच ‘एफ-16’ ही लढाऊ विमाने सरावात सहभागी झाली होती. तर दक्षिण कोरियाच्या ‘एफ-35ए’ या लढाऊ विमानांनी अमेरिकेबरोबर सराव केल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या हवाईदलाने दिली. अमेरिका व दक्षिण कोरियामधील युद्धसराव गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे.

उत्तर कोरियाकडून एकापाठोपाठ सुरू असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या व त्यांना मिळत असलेले यश क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात या देशाच्या वाढत्या क्षमतेचे संकेत देणाऱ्या ठरतात, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info