युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा तिसर्‍या महायुद्धाचा इशारा

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा तिसर्‍या महायुद्धाचा इशारा

किव्ह – मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. पण ही चर्चा फिस्कटली तर तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडाल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिला. युक्रेनच्या मारिओपोल शहरावर रशियाने हवाई हल्ले आणि तोफांचा मारा सुरू ठेवला असून शरणांगतीचा इशारा दिला आहे. मात्र युक्रेनने रशियाची ही मागणी धुडकावली असून त्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही तिसर्‍या महायुद्धाची धमकी दिली.

या युद्धाच्या २६ व्या दिवशी युक्रेनच्या सुमी शहरामध्ये अमोनियाची गळती झाल्याची बातमी आली होती. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर युक्रेनच्या इतर शहरांबरोबरच मारिओपोल शहरावर रशियाने भीषण हल्ल्यांची मालिका सुरू ठेवलेली आहे. रशियाने दिलेला शरणांगतीचा इशारा धुडकावून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला नव्या धमक्या दिल्या आहेत. युक्रेन चर्चेला तयार आहे. पण या चर्चेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सहभागी व्हावे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. त्याचवेळी ही चर्चा फिस्कटली तर तिसरे महायुद्ध पेट घेईल, असे झेलेन्स्की यांनी बजावले आहे. याआधी देखील झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी थेट चर्चेची मागणी केली होती. पण रशियाने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

रशिया युक्रेनच्या शहरांवर हल्ले चढवून निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचे आरोप झेलेन्स्की करीत आहेत. आता अमेरिकेने देखील रशियाने युक्रेनमध्ये आत्तापर्यंत ११०० क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा आरोप केला. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युद्धगुन्हेगार असल्याची शेरेबाजी केली होती. यावर रशियाची प्रतिक्रिया उमटील असून रशियाने अमेरिकेच्या राजदूतांना समन्स बजावले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अशा विधानांमुळे रशिया-अमेरिका संबंध पूर्णपणे खंडीत होतील, असा इशारा अमेरिकेच्या राजदूतांना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.

दरम्यान, युक्रेनच्या उत्तरेकडील एका प्रांतात हवाई हल्ले चढवून युक्रेनच्या बाजूने लढणारे शंभराहून अधिक कंत्राटी जवान रशियाने ठार केल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यातही रशियाने युक्रेनच्या लिव्ह शहरात युक्रेनसाठी लढणार्‍या १८० कंत्राटी जवानांना ठार केल्याचा दावा केला होता.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info