युक्रेनमधील ओडेसा बंदरावर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले

मॉस्को/ओडेसा – युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर व तिसऱ्या क्रमाकांचे शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ओडेसावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकी शस्त्रांचा साठा व ओडेसा विमानतळाच्या धावपट्टीला लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही दिवसात रशियाने ओडेसा व नजिकच्या क्षेत्रातील हल्ले वाढविले असून मारिपोलनंतर हे शहर रशियाचे मुख्य ‘टार्गेट’ असेल, असे सांगण्यात येते. दरम्यान, मारिपोलच्या स्टील फॅक्टरीतून गेल्या 48 तासांमध्ये 80हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने याला दुजोरा दिला.

ओडेसा

गेल्याच महिन्यात रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची घोषणा केली होती. या टप्प्यात, रशियन संरक्षणदलांसमोर पूर्व व दक्षिण युक्रेनवर ताबा मिळविण्याचे ध्येय असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी रशियन फौजांनी अत्यंत आक्रमक स्वरुपाचे हल्ले सुरू केले आहेत. पूर्वेकडील डोन्बास आघाडीवर हल्ल्यांची तीव्रता मोठी असून या भागातील अनेक शहरे व मोक्याचे भाग ताब्यात घेण्यात रशियाला यश मिळाले आहे. त्यापाठोपाठ रशियाने आता आपला मोर्चा दक्षिण युक्रेनकडे वळविला असून ओडेसासह नजिकच्या भागांवर सुरू झालेले हल्ले त्याचाच भाग मानण्यात येतो.

एकेकाळी रशियन साम्राज्य तसेच सोव्हिएत संघराज्यातील आघाडीचे व मुक्त बंदर असणाऱ्या ओडेसाची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. हे शहर जहाजबांधणी, इंधन तसेच दळणवळणाचे मुख्य केंद्र असून एकेकाळी या बंदरात रशियाचा नौदल तळही होता. 2014 साली युक्रेनमध्ये झालेल्या बंडादरम्यान, ओडेसामध्ये युक्रेन समर्थक व रशियासमर्थकांमध्ये मोठा संघर्ष उडाला होता. या शहरावर रशियाने ताबा मिळविल्यास दक्षिण युक्रेनवर नियंत्रण ठेवणे रशियाला सहज शक्य होईल, असे सांगण्यात येते.

ओडेसा

पूर्व युक्रेनमधील मारिपोलवर मिळविलेल्या ताब्यानंतर रशियाने आता ओडेसावर लक्ष केंद्रेित केल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसात रशियन फौजांनी टप्प्याटप्प्याने ओडेसावरील हल्ले वाढविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी ओडेसावर ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’च्या सहाय्याने हल्ले करून रशियाने भविष्यातील मोठ्या कारवाईचे संकेत दिल्याचे दिसत आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ओडेसा विमानतळावरील धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्याचवेळी विमानतळाबजिक असलेला अमेरिकी शस्त्रसाठा नष्ट केल्याचा दावाही रशियन संरक्षण विभागाने केला आहे.

दरम्यान, रशियाने ताबा मिळविलेल्या मारिपोल शहरातील स्टील फॅक्टरीमधून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू झाली आहे. शनिवारी व रविवारी फॅक्टरीतून 80हून अधिक युक्रेनी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. यात प्रामुख्याने स्त्रिया व लहान मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्यांपैकी एका गटाला डोनेत्स्कमध्ये नेण्यात आल्याचे रशियाने स्पष्ट केले. स्टील फॅक्टरीतून नागरिकांना बाहेर काढल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्रसंघाने दुजोरा दिला आहे.

अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी युक्रेन दौऱ्यावर असून त्यांनी राजधानी किव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी पेलोसी यांनी अमेरिका अखेरपर्यंत युक्रेनला सहाय्य पुरवेल, असे आश्वासन पेलोसी यांनी दिले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info