युक्रेनच्या ओडेसावर रशियाकडून ‘हायपरसोनिक किन्झाल’चा मारा

ओडेसावर

मॉस्को/ओडेसा – मारिपोल व खेरसनसह पूर्व युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळविल्यानंतर रशियाने आपले लक्ष दक्षिण युक्रेनमधील मोक्याचे बंदर व नौदल तळ असलेल्या ओडेसावर केंद्रित केले आहे. सोमवारी रात्री रशियाच्या लढाऊ विमानाने ओडेसावर हायपरसोनिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यासाठी प्रगत ‘किन्झाल’ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. या हल्ल्यात शॉपिंग मॉल व हॉटेल्ससह एक डेपो उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येते. रशियाने ओडेसावर ताबा मिळविला तर युक्रेनचा सागरी मार्गाने असलेला संपर्क पूर्णपणे तुटेल व या देशाची अधिकच कोंडी होईल, असा दावा माध्यमे तसेच विश्लेषकांकडून करण्यात येतो.

दुसऱ्या महायुद्धातील रशियन विजयाचे प्रतीक असणाऱ्या ‘व्हिक्टरी डे’च्या पार्श्वभूमीवर रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांची व्याप्ती अधिकच वाढली आहे. रशियाने डोन्बासमधील विविध शहरांसह दक्षिण व मध्य युक्रेनमधील काही भागांवर नव्याने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यात ओडेसाला लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून रशियाने ओडेसावर ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’चे हल्ले सुरू केले होते. सोमवारी रात्री हायरपसोनिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले चढवून यापुढील संघर्ष या शहराच्या ताब्यासाठी असेल, असे संकेत रशियाने दिले आहेत.

ओडेसावर

ओडेसाबरोबरच दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह आणि पूर्व युक्रेनमधील क्रॅमाटोर्स्क, इझियम व खार्किव्ह शहरासाठी जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या शहरांवर रशियन फौजांकडून सातत्याने तोफा व रॉकेट्सचा मारा सुरू आहे. डोन्बास क्षेत्रातील पोपास्ना हे शहर रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी ‘ब्लॅक सी’मधील ‘स्नेक आयलंड’वर ताबा मिळविण्यासाठी युक्रेनी पथकाने केलेला हल्ला परतवून लावल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली. या हल्ल्यात युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून वापरण्यात येणारी ‘रॅप्टर’ प्रकारातील बोट उडवून दिल्याचा दावा केला आहे. ही बोट उडविण्यासाठी ‘लेझर गायडेड बॉम्ब’चा वापर झाल्याचेही सांगण्यात येते.

ओडेसावर

दरम्यान, मारिपोलमधील स्टील फॅक्टरीवर रशियाने पुन्हा बॉम्बहल्ले सुरू केल्याचे सांगण्यात येते. या फॅक्टरीत असलेल्या भूमिगत बंकर्समध्ये युक्रेनचे हजाराहून अधिक जवान अजूनही आश्रय घेऊन आहेत. यातील 100हून अधिक जवान जखमी असल्याचे दावेही समोर आले आहेत. या जवानांनी कोणत्याही परिस्थितीत आपण शरणागती पत्करणार नसल्याचे बजावले आहे. तर फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या 500 हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अद्याप काही नागरिक बंकर्समध्ये असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या 24 तासात रशियन संरक्षणदलांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या 380 जवानांना मारल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. हल्ल्यादरम्यान युक्रेनचे एक लढाऊ विमान पाडण्यात आले असून इंधन व शस्त्रांचे पाच डेपो उडवून दिल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

युक्रेनला अविरत शस्त्रपुरवठा करणाऱ्या कायद्यावर बायडेन यांची स्वाक्षरी 

ओडेसावर

वॉशिंग्टन – युक्रेनला वेगाने व अविरत शस्त्रपुरवठा सुरू रहावा यासाठी अमेरिकी संसदेने मंजूर केलेल्या ‘लेंड-लीझ ॲक्ट ऑफ 2022’वर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ‘रशियाविरोधातील संघर्ष कमी पैशात संपणारा नाही. पण युक्रेनला रशियन आक्रमणाविरोधात माघार घ्यावी लागली तर त्याची जबर किंमत मोजणे भाग पडेल’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कायद्याचे समर्थन केले.

‘लेंड लीझ ॲक्ट’ हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कायदा असून 1940 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या कायद्याच्या आधारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने ब्रिटन व मित्रदेशांना 50 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पुरविली होती. त्याची पुनरावृत्ती करून युक्रेनसह पूर्व युरोपिय देशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची योजना आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने युक्रेनला जवळपास चार अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य पुरविले आहे. त्यात क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रायफल्स, हेलिकॉप्टर्स, सशस्त्र वाहने, रडार्स व इतर लष्करी सामुग्रीचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकी संसदेसमोर युक्रेनला 33 अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info