मॉस्को – रशियाच्या सज्जड इशाऱ्यानंतरही फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखविली आहे. याचे परिणाम दिसू लागले असून रशियाने फिनलँडचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. फिनलँडच्या यंत्रणांनी याची माहिती दिली. त्याचवेळी फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष साउली निनिस्टो यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. या चर्चेत रशियन राष्ट्राध्यक्षांनी रशियाकडून धोका नसताना, नाटोसमध्ये सहभागी होऊन फिनलँडने आपली तटस्थता सोडू नये, याचे दुष्परिणाम समोर येतील, असे बजावले आहे.
युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी केल्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला होता. यानंतर युक्रेनचे युद्ध पेटले आणि हे युद्ध आता आणखी किती काळ सुरू राहिल, हे कुणीही सांगू शकत नसल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करीत आहेत. मात्र आपण नाटोमध्ये सहभागी होणार नाही, हे युक्रेनने जाहीर केल्यानंतर युद्ध थांबेल, असे रशियाचे म्हणणे आहे. रशियाची ही मागणी युक्रेन तसेच युक्रेनच्या मागे उभे राहणारे अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांना मान्य नाही. नाटोतील सहभागाच्या मुद्यावर युक्रेनवर हल्ला चढविणारा रशिया, तसाच निर्णय घेण्याच्या विचारात असलेल्या फिनलँड आणि स्वीडनवरही हल्ला करणार का, असा नवा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फिनलँड व स्वीडन या बाल्टिक देशांनीही नाटोत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत रशियाने फिनलँडचा वीजपुरवठा रोखून या देशाला पहिला धक्का दिल्याचे दिसतेे. या दरम्यान, फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष साउली निनिस्टो यांची रशियन राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा पार पडली. या चर्चेत राष्ट्राध्यक्ष निनिस्टो यांनी आपला देश लवकरच नाटोतील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर फिनलँडनेे पारंपरिक तटस्थतेचे धोरण बदलणे चुकीचे ठरेल, याचे दुष्परिणाम समोर येतील, याची जाणीव रशियन राष्ट्राध्यक्षांनी या फोनवरील चर्चेत करून दिली.
रशियापासून धोका नसताना, आपल्या धोरणात बदल केला तर त्याचे नकारात्मक परिणाम झाल्यावाचून राहणार नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांना बजावले आहे. तसेच युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी रशिया उत्सूक असला तरी यावरील वाटाघाटींबाबत युक्रेन गंभीर नसल्याचा आरोप रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या चर्चेत केला.
दरम्यान, फिनलँड व स्वीडनचा नाटोतील सहभाग तितकीशी सोपी बाब राहिलेली नाही. या मुद्यावर नाटोतच गंभीर मतभेद असल्याचे समोर येत आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीने या दोन्ही देशांच्या सहभागाला उघडपणे विरोध केला आहे. नाटोचे सदस्य असलेले इतर युरोपिय देश देखील अशा स्वरुपाची भूमिका स्वीकारू शकतात. या मुद्यावर अमेरिका व ब्रिटनशी इतर नाटो देशांचे मतभेद तीव्र होण्याची दाट शक्यता यामुळे समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |