वॉशिंग्टन – ध्वनीच्या पाचपट वेगाने प्रवास करणाऱ्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची घोषणा अमेरिकेच्या हवाईदलाने केली. अणुबॉम्ब वाहून नेऊ शकणाऱ्या ‘बी-52 एच’ या बॉम्बर विमानातून ही चाचणी घेण्यात आली. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेने हापरसोनिक क्षेपणास्त्राची दुसऱ्यांदा चाचणी घेतली. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेने आपल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाला गती दिल्याचा दावा केला जातो.
याआधी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. किमान दोन आठवडे अमेरिकेने या चाचणीबाबत माहिती देण्याचे टाळले होते. पण गेल्या महिन्यात अमेरिकेच्या हवाईदलाने हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणीची माहिती पहिल्यांदा उघड केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात 14 मे रोजी अमेरिकेने कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळ हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले.
अमेरिकन हवाईदलाच्या ‘बी-52 एच’ या बॉम्बर विमानातून ‘एजीएम-183′ प्रक्षेपित करण्यात आले. सदर क्षेपणास्त्र विमानातून विलग झाल्यानंतर बुस्टर इग्नाईट झाले आणि क्षेपणास्त्राने ध्वनीच्या पाचपट गतीने प्रवास केल्याचे अमेरिकन हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अवघ्या दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन अमेरिका युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाला इशारा देत असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.
तसेच बायडेन प्रशासनाने जाहीर केलेल्या संरक्षण खर्चात हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी 4.7 अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याची आठवण अमेरिकेतील माध्यमे करून देत आहेत. ‘ऑकस’ या नव्याने उभ्या राहिलेल्या गटामार्फत अमेरिका ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या मित्रदेशांसह हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करणार असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिकेने बॉम्बर विमानातून प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्राचा माग काढणे आणि त्याला लक्ष्य करणे अवघड असल्याचा दावा ही माध्यमे करीत आहेत.
पण अमेरिकेच्या हवाईदलाने प्रक्षेपित केलेले हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या पाचपट वेगाने प्रवास करते. तर रशियन हवाईदलात वापरात असलेले किंझल किंवा डॅगर हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या दहापट वेगाने प्रवास करीत असल्याचा दावा रशिया करीत आहे. आठवड्यापूर्वीच रशियन हवाईदलाने युक्रेनमधील युद्धात ओडेसावर हल्ले चढविण्यासाठी किंझल क्षेपणास्त्राचा वापर केला होता. त्यामुळे हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीत आणि वापरात अमेरिका अजूनही मागे असल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.
दरम्यान, रशिया व चीन हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीत वेगाने पावले टाकत असल्याचा दावा अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांनी याआधी केला होता. रशिया-चीनच्या तुलनेत अमेरिकेला या क्षेत्रात गती वाढवावी लागेल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |