युक्रेन युद्ध म्हणजे रशिया-नाटो संघर्षाची तालीम

- रशियन विश्लेषकांचा दावा

मॉस्को – ‘रशियाकडून युक्रेनमध्ये सुरू असलेली मोहीम ही भविष्यातील मोठ्या युद्धाची तालीम आहे. रशिया नाटोच्या शस्त्रांविरोधात आपल्या शस्त्रांची क्षमता चाचपून बघत आहे. रशियन शस्त्रे नाटोच्या तुलनेत किती प्रभावी आहेत, याची चाचणी घेतली जात आहे. हे युद्ध म्हणजे भविष्यातील युद्धांसाठी रशियन फौजांना मिळालेला चांगला धडा आहे’, असा दावा रशियन विश्लेषक अलेक्सी फेनेन्को यांनी केला. तर रशियाचे माजी लष्करी अधिकारी मिखाईल खोदारिनोक यांनी, रशियाने आपल्या संरक्षणक्षमतेच्या 10 टक्के क्षमताही अजून वापरलेली नाही, असा इशारा दिला.

तालीम

रशियाने गेल्या काही दिवसात युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. डोन्बास क्षेत्रासह दक्षिण तसेच मध्य युक्रेनमध्ये सातत्याने क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा मारा सुरू आहे. डोन्बासमध्ये रशियाने मोठा भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. तर किव्ह तसेच खार्किव्ह या दोन शहरांमधून रशियाला माघार घ्यावी लागली आहे. रशियाच्या या माघारीमागे नाटो देशांकडून युक्रेनला झालेला प्रचंड प्रमाणातील शस्त्रपुरवठा हा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. नाटोचे सदस्य देश असलेल्या अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, तुर्की, पोलंड या देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरविली आहेत.

नाटोने अधिक प्रगत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रे पुरवावीत अशी मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. युक्रेनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिका तसेच युरोपिय महासंघाने मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणाही केली आहे. अमेरिकेसह नाटो सदस्य देशांकडून युक्रेनला करण्यात येणाऱ्या सहाय्याची आपल्याला पूर्ण कल्पना असून रशियन फौजा त्यानुसार त्याला प्रत्युत्तर देतील, असे रशियन नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येते.

तालीम

रशिया-युक्रेन युद्धामागे युक्रेनची नाटोचा सदस्य होण्याची इच्छा हे एक प्रमुख कारण होते. मात्र रशियाला नाटोच्या वाढत्या लष्करी तैनातीचा धोका आपल्या सीमेनजिक नको आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नाटोला रशियन सीमेनजिक प्रभाव वाढवू देणार नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला होता. आवश्यकता भासली तर रशिया आपल्या सुरक्षेसाठी अण्वस्त्राचा वापर करु शकतो, असेही पुतिन यांनी बजावले होते. यापूर्वी विविध विश्लेषक व तज्ज्ञांनी वर्तविलेल्या भाकितांनुसार, युद्ध भडकल्यास रशिया नाटोला भारी पडू शकतो, असेही म्हटले होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता फेनेन्को यांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, रशियाने युक्रेनच्या झायटोमिर प्रांतात परदेशी शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. अमेरिका व युरोपिय देशांकडून मिळालेला हा शस्त्रसाठा डोन्बासमधील युक्रेनी फौजांसाठी पाठविण्यात येणार होता, असे रशियन लष्कराने सांगितले. गेल्याच आठवड्यात रशियाने युक्रेनच्या लिव्ह शहरातील परदेशी शस्त्रसाठ्याच्या तळावर हल्ला केल्याचाही दावा केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info