तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे

- ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ‘काही वर्षांपूर्वीच तिसरे महायुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी लढले जात आहे, याची जाणीव मला झाली होती. पण आज तिसरे महायुद्ध घोषित झाल्याचे मला जाणवत आहे’, असे ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. युक्रेनमधील युद्धाबाबत दिलेल्या एका मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांनी हा दावा केला. ‘केवळ युक्रेनच्या युद्धाकडे पाहून आपण व्यथित होत आहोत. पण केवळ युक्रेनच नाही तर, नायजेरिया आणि म्यानमारसारख्या ठिकाणीही असेच युद्ध सुरू आहे आणि त्याची कुणालाही पर्वा नाही. जग युद्धाच्या खाईत सापडले आहे. त्यावर आपल्याला विचार करावाच लागेल’ अशा शब्दात पोप फ्रान्सिस यांनी साऱ्या जगाला वास्तवाची जाणीव करून दिली.

तिसरे महायुद्ध

काही आठवड्यांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेली मुलाखत नुकतीच एका इटालियन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. त्यानंतर जगभरातील माध्यमांनी या मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांनी केलेली विधाने उचलून धरली आहेत. नाटोने दिलेल्या चिथावणीमुळे रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला, असे परखड मत पोप फ्रान्सिस यांनी याआधी व्यक्त केले होते. त्यामुळे ते युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची बाजू घेत असल्याची टीका काहीजणांनी केली होती. मात्र पोप फ्रान्सिस यांनी आपण पुतिन यांची बाजू घेतलेली नाही, असे सांगून आपल्याविरोधातील हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या क्रौर्याकडे पाहत असताना, आपल्याला या समस्येचे मूळ जाणून घ्यायला हवे व ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे सूचक उद्गार पोप फ्रान्सिस यांनी काढले. आपल्याला केवळ युद्धातील क्रौर्य व अमानुषता दिसते. पण त्याच्या पलिकडे जाऊन यामागे असलेली पार्श्वभूमी लक्षात घ्यायला आपण तयार नाहीत. शस्त्रास्त्रांची चाचण्या आणि त्याची विक्री यांचा व्यवहार युद्धाच्या मागे आहे. ही दुर्दैवी बाब आहे, तरीही हा शस्त्रास्त्रांचा व्यापार ही युद्धाच्या मागील महत्त्वाचा घटक ठरतो. युक्रेनची जनता मोठ्या शौर्याने प्रतिकार करीत आहे खरी. पण युक्रेनच्या बाहेरील कुणाच्या तरी हितसंबंधांमुळे युक्रेनी जनतेवर ही परिस्थिती ओढावलेली आहे, असे पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले.

जागतिक पातळीवरील युद्ध, हितसंबंध, शस्त्रास्त्रांची विक्री आणि भू-राजकीय महत्त्वाकांक्षा यांच्यासाठी सर्वसामान्य जनतेचा बळी जात आहे, अशी खंत आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केली.

युक्रेनचे युद्ध सुरू होण्याआधी एका देशाच्या सूज्ञ राष्ट्रप्रमुखांशी आपली भेट झाली होती व त्यांनी आपल्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली होती, अशी माहिती पोप फ्रान्सिस यांनी या मुलाखतीत दिली. ‘नाटो रशियाच्या दरवाज्यापर्यंत येऊन आरडाओरडा करीत आहे, पण रशियन्स आपल्या क्षेत्रात परकीय शक्तींचा हस्तक्षेप स्वीकारणार नाहीत, हे काही नाटो लक्षात घ्यायला तयार नाही. यामुळे उद्भवलेली परिस्थिती युद्धाला तोंड फोडू शकते, असे या राष्ट्रप्रमुखाने बजावले होते. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. त्या राष्ट्रप्रमुखाने याचा धोका आधीच ओळखला होता’ याकडे पोप फ्रान्सिस यांनी लक्ष वेधले.

युक्रेनचे युद्ध आठवडाभरात संपेल असे रशियाला वाटत होते, पण त्यांनी या युद्धाचे परिणाम समजून घेण्याच चूक केली, असा निष्कर्षही पोप फ्रान्सिस यांनी नोंदविला आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info