रशियाला ‘टार्गेट’ केल्यास मानवजातीचे अस्तित्त्व धोक्यात येईल

- माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारा

मानवजातीचे अस्तित्त्व

मॉस्को/किव्ह – ‘जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे असणाऱ्या देशाला शिक्षा करण्याची कल्पनाच मूर्खपणाची आहे. अशा कारवाईमुळे संपूर्ण मानवजातीचे अस्तित्त्वच धोक्यात येऊ शकते’, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. ‘इंटनॅशनल क्रिमिनल कोर्टा’ने (आयसीसी) रशियाविरोधात कारवाई करण्याचे प्रयत्न टाळावेत, असेही मेदवेदेव्ह यांनी बजावले. मेदवेदेव्ह इशारा देत असतानाच रशियाने सैबेरिया भागात ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या युद्धगुन्ह्यांच्या मुद्दा ऐरणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका व युरोपिय देशांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेनेही रशियाकडून युक्रेन संघर्षात गुन्हे होत असल्याचा दावा केला. या मुद्यावरून रशियाला जबर शिक्षा करण्याची योजना असून त्याविरोधात रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष व रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख असणाऱ्या मेदवेदेव्ह यांचे वक्तव्य त्याचाच भाग ठरतो.

मानवजातीचे अस्तित्त्व

अमेरिका ‘आयसीसी’ माध्यमातून अरासकता व विनाशाची बीजे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिका ही एकतर फाजिल धाडस करण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा अत्यंत मूर्ख आहे, असा आरोपही रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला. यावेळी मेदवेदव्ह यांनी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या विविध भागांमध्ये केलेल्या युद्धांचा उल्लेख केला. व्हिएतनामपासून ते सिरियापर्यंत सर्व देशांना अमेरिकेची कृत्ये माहित आहेत. अमेरिकेने जवळपास 37 देशांमधील दोन कोटींहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे, अशी घणाघाती टीकाही दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी केली.

मानवजातीचे अस्तित्त्व

मेदवेदव्ह टीकास्त्र सोडत असतानाच रशियाने आपली आण्विक सज्जता मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. बुधवारपासून सैबेरियाच्या पश्चिम भागात व्यापक ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ना सुरुवात झाली आहे. या सरावाच्या सुरुवातीलाच रशियन दलांनी ‘यार्स’ या आंतरखंडिय अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राचा पल्ला 11 हजार किलोमीटर्सहून अधिक आहे. युक्रेनविरोधात लष्करी मोहिम सुरू केल्यानंतर काही दिवसातच राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रशियाने तीनदा अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा चाचण्या घेतल्या आहेत.

दरम्यान, रशियाने डोन्बास क्षेत्रातील स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमतमध्ये बुधवारी तसेच गुरुवारी मोठे हल्ले चढविल्याची माहिती रशियन संरक्षणदलांनी दिली. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या दोन प्रगत ‘हायमार्स’ यंत्रणा नष्ट केल्याचा दावा रशियाने केला. त्याचवेळी ओडेसानजिकच्या ‘स्नेक आयलंड’वर क्षेपणास्त्रहल्लाही चढविण्यात आल्याचे रशियन संरक्षणदलांकडून सांगण्यात आले. तर दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व उत्तरेकडील खार्किव्हलाही रशियाने लक्ष्य केल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info