मॉस्को/किव्ह – युक्रेनला मिळणाऱ्या परदेशी शस्त्रसाठ्यांवर हल्ले रशियाने अधिक तीव्र केले आहेत. सोमवारी रशियाने दक्षिण युक्रेनमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या ओडेसावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला चढविला. या हल्ल्यात तुर्की ड्रोन्स व ड्रोन कंट्रोल स्टेशनला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षणविभागाने दिली. ओडेसाव्यतिरिक्त सेव्हेरोडोनेत्स्क तसेच खार्किव्ह भागातही हल्ले चढविल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ब्रिटनचे नवे लष्करप्रमुख जनरल सर पॅट्रिक सँडर्स यांनी, ब्रिटीश संरक्षणदलांनी युरोपच्या रणांगणात रशियाविरोधातील संघर्षासाठी सज्ज व्हावे, असा इशारा दिला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक आक्रमक व भीषण होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता वाढत असून युक्रेनी लष्कराला मोठी जीवितहानी सोसावी लागत असल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, रशिया येत्या काही दिवसात हल्ल्यांची व्याप्ती अधिकच वाढवेल, असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसात युरोपिय महासंघातील युक्रेनच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. ही प्रक्रिया सुरू असताना रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक प्रखर होऊ शकतात, असे झेलेन्स्की यांनी बजावले.
युक्रेनचे लुहान्स्क प्रांतातील अधिकारी सर्हिय हैदाई यांनी, सेव्हेरोडोनेत्स्कमधील स्थिती विदारक व भयावह बनल्याचा दावा केला. ‘सेव्हेरोडोनेत्स्कमधील सिमेंट फॅक्टरीचा परिसर वगळता संपूर्ण शहर रशियाच्या ताब्यात आहे. डोन्बासमध्ये नवी लष्करी पथके व संरक्षणयंत्रणा उतरविणारा रशिया 24 तास सातत्याने हल्ले चढवित आहे. त्यांचा मुकाबला करणे युक्रेनी पथकांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे’, अशी कबुलीही त्यांनी दिली. युक्रेनमधील मोहीम यशस्वी करण्यासाठी रशियाने डोन्बास क्षेत्राबरोबरच इतर भागांमध्येही हल्ले सुरू ठेवले आहेत.
रविवारी डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सोमवारी दक्षिण युक्रेनमधील मोक्याचे शहर असणाऱ्या ओडेसाला लक्ष्य करण्यात आले. ओडेसामधील ‘अर्तसिझ’ हवाई तळावर ‘ओनिक्स’ या हाय प्रिसिजन क्षेपणास्त्राच्या सहाय्याने हल्ला चढविला. हल्ल्यात तळावर असलेल्या तुर्कीच्या ‘बेरक्तर ड्रोन्स’सह ड्रोन कंट्रोल स्टेशन उडवून देण्यात आल्याची माहिती रशियन प्रवक्त्यांनी दिली. रशियन रणगाडे तसेच रॉकेट सिस्टिम्स उद्ध्वस्त करण्यात तुर्की ड्रोन्सनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले होते. त्यामुळे रशियाचा हा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
दरम्यान, ब्रिटनचे नवे लष्करप्रमुख जनरल सर पॅट्रिक सँडर्स यांनी, ब्रिटनच्या संरक्षणदलांना उद्देशून एक पत्र लिहिल्याचे उघड झाले आहे. या पत्रात त्यांनी, ब्रिटीश फौजांना युरोपच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा रणांगणात उतरावे लागेल, असे बजावले. या पत्रात जनरल सँडर्स यांनी रशियाचा उघड उल्लेख करून ब्रिटनला रशियाविरोधी संघर्षासाठी तयार रहावे लागेल, असेही म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |