मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रासाठीची निर्णायक लढाई म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्कवर रशियन फौजांनी पूर्ण ताबा मिळविला आहे. या ताब्यापाठोपाठ सेव्हेरोडोनेत्स्कपासून जवळ असणाऱ्या लिशिचान्स्क शहरातही रशियन लष्कर घुसल्याची माहिती रशिया समर्थक बंडखोरांकडून देण्यात आली. मारिपोलवरील ताब्यानंतर रशियाला मिळालेले हे दुसरे निर्णायक सामरिक यश ठरले आहे. त्याचवेळी पाश्चिमात्यांकडे सातत्याने शस्त्रे व अर्थसहाय्याची मागणी करून रशियाला पराभूत करण्याचे दावे करणाऱ्या युक्रेनला मोठा धक्का बसला आहे. सेव्हेरोडोनेत्स्कवरील विजय व लिशिचान्स्कमध्ये आगेकूच करीत असतानाच रविवारी रशियाने राजधानी किव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा करीत युक्रेनी नेतृत्त्वाला पुन्हा एकदा वास्तवाची जाणीव करून दिली.
जवळपास महिन्याभराच्या संघर्षानंतर रशियाने डोन्बासमधील मोक्याचे शहर असणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्कवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. शहराची जबाबदारी असणाऱ्या युक्रेनी अधिकाऱ्यांनी शनिवारी याला दुजोरा दिला. युक्रेनच्या लष्करी तुकड्या व नागरिकांनी ॲझोट सिमेंट फॅक्टरी परिसरातून माघार घेण्यास सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनी तुकड्या लिशिचान्स्कमध्ये आश्रय घेतील, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र रशियाचे पुढील लक्ष्य लिशिचान्स्कच असल्याने युक्रेनी तुकड्यांना लवकरच नव्या संघर्षाला सामोरे जावे लागेल, असे मानले जाते.
रशियन संरक्षणदलांनी गेल्या आठवडयात लिशिचान्स्कजवर असणारी काही गावे तसेच मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. रविवारी रशियन लष्कराच्या तुकड्या लिशिचान्स्कच्या सीमेवरून आत घुसल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे हे शहर सेव्हेरोडोनेत्स्कच्या तुलनेत कमी वेळात रशियाच्या ताब्यात येईल, असे सांगण्यात येते. सेव्हेरोडोनेत्स्कमधील रशियाच्या घणाघाती हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराला मोठी जीवितहानी सोसावी लागली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, युक्रेनी लष्कर लिशिचान्स्कऐवजी इतर भागांच्या बचावावर लक्ष केंद्रित करेल, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.
दरम्यान, सेव्हेरोडोनेत्स्कवर ताबा मिळविल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. रविवारी पहाटे व सकाळी किव्हवर जवळपास 10 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांसाठी रशियाने बॉम्बर विमाने व ‘केएच-21 मिसाईल्स’चा वापर केल्याचे सांगण्यात येते. किव्हवर इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रहल्ला करण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ ठरली आहे. या हल्ल्यांमधून रशियाने युक्रेनी नेतृत्त्वाला नवा इशारा दिल्याचे मानले जाते.
रशिया बेलारुसला अण्वस्त्रवाहू ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्रे पुरविणार
मॉस्को/मिन्स्क – रशिया शेजारी देश असलेल्या बेलारुसला अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली ‘इस्कंदर’ ही प्रगत क्षेपणास्त्रयंत्रणा पुरविणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ही घोषणा केली. या यंत्रणेत बॅलिस्टिक व क्रूझ अशा दोन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश असून त्याचा पल्ला सुमारे 500 किलोमीटरपर्यंत आहे. बाल्टिकमधील रशियन तळ असलेल्या कॅलिनिनग्रॅडमध्ये रशियाने ही यंत्रणा तैनात केल्याचे मानले जाते. तसेच सध्या सुरू असलेल्या युक्रेन युद्धातही पारंपारिक इस्कंदर क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे दावे करण्यात आले आहेत. बेलारुसला अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविणे हे नाटोकडून युक्रेनसह पूर्व युरोपातील शस्त्रतैनातीला दिलेले प्रत्युत्तर ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |