मॉस्को – अजस्र आकाराचे सहा पोसायडन टॉर्पेडो, जवळपास 100 मेगाटन आण्विक स्फोटकांनी सज्ज असलेली ‘बेल्गोरोड’ पाणबुडी रशियाच्या नौदलात सामील झाली. यातून प्रक्षेपित होणाऱ्या ड्रोनमुळे शत्रूच्या किनारपट्टीवर किरणोत्सर्गी त्सुनामीचा हल्ला चढविता येऊ शकतो, असा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत. त्यामुळे बेल्गोरोड पाणबुडीच्या रशियन नौदलातील समावेशामुळे पाश्चिमात्य देशांची झोप उडाली आहे.
2018 साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर येत्या काळात रशियन संरक्षणदलात सामील होणाऱ्या ‘सुपरवेपन्स’ची घोषणा केली होती. यामध्ये ‘पोसायडन’ टॉर्पेडो, तसेच जगातील सर्वात मोठ्या आकाराची ‘बेल्गोरोड’ पाणबुडी आणि त्सुनामी निर्माण करणाऱ्या ड्रोनचा समावेश होता. यापैकी 600 फूट लांब, 30 हजार टन वजनाची बेल्गोरोड पाणबुडी या टॉर्पेडो व ड्रोनने सज्ज असेल, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली होती.
रशियाची ही पाणबुडी व टॉर्पेडो पाश्चिमात्य विश्लेषकांना धडकी भरविणारे होते. या पाणबुडीच्या समावेशामुळे रशियाचा जगातील सर्वात विध्वंसक नौदलामध्ये समावेश होऊ शकतो, असा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता.
दरम्यान, युक्रेन युद्धामुळे युरोपात तणाव निर्माण झालेला असताना रशियाने सदर पाणबुडी आपल्या नौदलात सामील करून अमेरिका व नाटोला इशारा दिल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |