रशियाच्या तीव्र हल्ल्यांमुळे युक्रेनची मोठी हानी

- युक्रेनी अधिकाऱ्यांचा दावा

हानी

मॉस्को/किव्ह – रशियाकडून युक्रेनमध्ये होणारे हल्ले दिवसेंदिवस अधिक तीव्र व व्यापक होत असून त्यामुळे युक्रेनमध्ये जबरदस्त जीवित हानी होत असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. गेल्या महिन्यात रशियन फौजांनी आपली मोहीम डोन्बास क्षेत्रापुरतीच मर्यादित ठेवल्याचे दिसून आले होते. मात्र लुहान्स्कवरील ताब्यानंतर रशियाने दक्षिण, मध्य तसेच उत्तर युक्रेनमध्येही जोरदार मारा सुरू केला. त्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत असल्याचे कबुली युक्रेनी अधिकारी देत आहेत. दरम्यान, गेल्या 48 तासात रशियाने सिवेेर्स्क शहरात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे जवळपास 600 जवान मारले गेल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला.

हानी

लुहान्स्कवर नियंत्रण मिळविल्यानंतर रशियाने संपूर्ण डोन्बास क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार डोनेत्स्क प्रांतातील स्लोव्हियान्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमत या शहरांच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. दरदिवशी रशियन फौजा महत्त्वाचे मार्ग तसेच गावे ताब्यात घेत असल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. डोनेत्स्कवरील हल्ल्यांबरोबरच रशियाने मध्य तसेच उत्तर युक्रेनमध्ये नव्याने हल्ले सुरू केले आहेत. उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह प्रांत ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांना निर्देश देण्यात आल्याचे दावे सूत्रांनी केले आहेत.

याव्यतिरिक्त दक्षिण युक्रेनमध्ये मायकोलेव्ह तसेच ओडेसावर ताबा मिळविण्याचीही योजना असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी या भागात नव्याने हल्ले सुरू करण्यात आले आहेत. मध्य युक्रेनमध्ये डिनिप्रो शहरावरही हल्ले करण्यात येत आहेत. युक्रेन मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले व क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. त्याची पुनरावृत्ती रशियन फौजांकडून करण्यात येत असून युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागण्यात येत आहेत. रशियाच्या या माऱ्यामुळे युक्रेनमधील जीवित तसेच वित्तहानीची व्याप्ती वाढत असल्याकडे युक्रेनी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

हानी

युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्सने रशिया आक्रमणाचा नवा टप्पा सुरू करण्याची तयारी करीत असल्याचा इशारा दिला. गेल्या काही दिवसात रशियाकडून युक्रेनच्या आघाडीवरील बहुतांश क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. ही नव्या टप्प्याची पूर्वतयारी असू शकते, असे युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. डोन्बास तसेच दक्षिण युक्रेनमध्ये रशिया आपल्या लष्करी पथकांची फेररचना करीत असल्याचे दावेही करण्यात येत आहेत.

दरम्यान, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी नजिकच्या काळात रशियन फौजा युक्रेनविरोधात अधिक आक्रमक धोरण राबवतील, असे बजावले. रशियन फौजांना युक्रेनकडून होणाऱ्या हल्ल्यांना जबर प्रत्युत्तर देण्याचे तसेच सर्व आघाड्यांवरील माऱ्याची तीव्रता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे शोईगू यांनी सांगितले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info