उत्तर कोरियाच्या हुकूमशहांकडून अण्वस्त्रांच्या विस्ताराची घोषणा

- दक्षिण कोरियावरील हल्ल्याचे संकेत

सेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे नेते उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी घायकुतीला आले आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा आक्रमक विस्तार करणार असल्याची घोषणा या देशाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली. त्याचबरोबर संभाव्य युद्धासाठी आपल्या लष्कराने केलेल्या सज्जतेचा आढावा किम जाँग-उन यांनी घेतला, अशी माहिती उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. दरम्यान, हुकूमशहा किम यांनी दक्षिण कोरियावर हल्ल्याची तयारी केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

अण्वस्त्रांच्या विस्ताराची

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’मधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत किम यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसरावावर जोरदार टीका केली. उत्तर कोरियाचे हे दोन्ही शत्रू देश हल्ल्यासाठी उतावीळ झाले असून त्यांचा युद्धसराव देखील आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे हुकूमशहा किम म्हणाले. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाच्या लष्कराने आपली शस्त्रसज्जता वाढवावी आणि युद्धाची तयारी ठेवावी, असे आदेश किम यांनी दिले.

याबाबत अधिक बोलताना उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी अण्वस्त्रांबाबत मोठी घोषणा केली. अमेरिका व दक्षिण कोरियाकडून असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी अण्वस्त्रांची निर्मिती वाढविणे आवश्यक असल्याचे किम जाँग-उन म्हणाले. तसेच उत्तर कोरियाला अधिक आक्रमकतेने या अण्वस्त्रांचा विस्तार करावा लागणार असल्याचे किम यांनी स्पष्ट केले. उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने याबाबतचा किम जाँग-उन यांचा लष्करी अधिकाऱ्यांबरोबरील बैठकीचा व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले.

यामध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशहा आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना नकाशातील काही ठिकाणे दाखवत असताना दिसत असून हा दक्षिण कोरियाचा नकाशा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे किम जाँग-उन यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना दक्षिण कोरियावरील हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले असावे, अशी शक्यता हे विश्लेषक वर्तवित आहेत. त्यामुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे लष्करी अधिकारी आपल्या फोनला उत्तर देत नसल्याची तक्रार दक्षिण कोरिया करीत आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील लष्करी हॉटलाईनदेखील काम करीत नसल्याचे सांगून दक्षिण कोरियन माध्यमे चिंता व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत, उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी आपल्या लष्कराला दिलेले आदेश व त्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यामुळे कोरियन क्षेत्रातील युद्धाची शक्यता बळावल्याचा दावा केला जातो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info