गाझातून इस्रायलवर 580 रॉकेट हल्ले

  • जेरूसलेम शहराच्या दिशेने रॉकेट प्रक्षेपित केले
  • पीआयजेचे सर्व कमांडर ठार केल्याचा इस्रायलचा दावा
  • इस्रायलने गाझातील 140 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले

580 रॉकेट हल्ले

गाझा/जेरूसलेम – गाझापट्टीतील ‘पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद-पीआयजे’ दहशतवादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. पीआयजेने इस्रायलवर सुमारे 580 रॉकेट हल्ले चढविले. यातील काही रॉकेट्सचा मारा इस्रायलमधील जेरूसलेम या अतिशय संवेदनशील ठिकाणाच्या दिशेने करण्यात आला होता, असा आरोप इस्रायलने केला. इस्रायलने देखील गाझातील दहशतवाद्यांच्या 140 ठिकाणांना लक्ष्य करून आपल्या कारवाईची तीव्रता वाढविली. पीआयजेच्या सुरक्षा विभागाशी संबंधित सर्व कमांडर या कारवाईत ठार झाले असून यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नेता खालेद मन्सूर याचा समावेश आहे.

इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन ब्रेकिंग डाऊन’ अंतर्गत गाझातील पीआयजेच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. इस्रायली लष्कराने यादी बनविलेले पीआयजेचे सारे कमांडर ठार झाल्याची माहिती, या मोहिमेचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल ओदेद बास्यूक यांनी दिली. पीआयजेचा दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर व ‘अल कुद्स ब्रिगेड’चा प्रमुख खालेद मन्सूर यालाही ठार करण्यात यश मिळाल्याचे मेजर जनरल बास्यूक म्हणाले. सलग दुसऱ्या दिवशी पीआयजेला जबरदस्त हादरा देण्यात इस्रायली लष्कर यशस्वी झाल्याचे बास्यूक यांनी सांगितले. खालेद मन्सूर याने याआधी गाझाच्या दक्षिणभागातून इस्रायलवर हल्ले चढविले होते.

580 रॉकेट हल्ले

इस्रायलच्या या कारवाईत 31 पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचा दावा गाझातील हमाससंलग्न आरोग्य संघटना करीत आहेत. तर आपल्या कारवाईत बहुतांश दहशतवादी ठार झाल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी हमासने देखील इस्रायलवर प्रतिदिन शेकडो रॉकेट हल्ले चढविले होते. 11 दिवस चाललेल्या या संघर्षात हमासने इस्रायलवर साडे तीन हजारांहून अधिक रॉकेट्सचा वर्षाव केला होता. पीआयजे गेल्या वर्षीच्या हल्ल्याची पुनरावृत्ती होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. यासाठी इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल आणि पीआयजेमधील हा संघर्ष सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info