युरोपिय देशांमध्येही अणुप्रकल्प आहेत तिथेही आण्विक दुर्घटना घडू शकते

- रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची धमकी

मॉस्को – सध्या रशियाच्या नियंत्रणात असलेल्या युक्रेनच्या झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या राजदूतांनी युक्रेनच्या हल्ल्यामुळे इथे आण्विक दुर्घटना घडू शकते, असा इशारा दिला. तर या अणुऊर्जा प्रकल्पात दुर्घटना झालीच, तर त्याला रशिया जबाबदार असेल, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. यावर रशियातून जहाल प्रतिक्रिया येत आहेत. झॅपोरिझिआमध्ये आण्विक दुर्घटना घडलीच, तर युरोपिय देशांमध्येही अणुऊर्जा प्रकल्प आहेत आणि तिथेही आण्विक दुर्घटना घडू शकते, अशी धमकी रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे.

अणुप्रकल्प

युक्रेनचे लष्कर झॅपोरिझिआ येथील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ले चढवित आहे. आधी झालेल्या हल्ल्यांमधून हा प्र्रकल्प कसाबसा वाचला व आण्विक दुर्घटना टळली, असे रशियाचे म्हणणे आहे. पुढच्या काळात या प्रकल्पावर युक्रेनने मारा केला आणि त्यातून अनर्थ घडला तर त्याला सर्वस्वी युक्रेन जबाबदार असेल, असे रशिया वारंवार बजावत आहे. सुरक्षा परिषदेत रशियाच्या राजदूतांनी याची जाणीव करून दिली होती. युक्रेनच्या मागे उभे राहणाऱ्या युरोपिय देशांनाही रशिया सातत्याने या धोक्याची कल्पना देत आहे. पण ते याचे गांभीर्य लक्षात घ्यायला तयार नाहीत, असे रशियाचे राजदूत म्हणाले होते. तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मात्र रशिया ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.

अशा परिस्थितीत झॅपोरिझिआमधील या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या युरोपिय देशांना रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी थरकाप उडविणारा इशारा दिला. युक्रेनचे लष्कर या अणुऊर्जा प्रकल्पावर मारा करीत आहे. याबाबत रशिया देत असलेल्या इशाऱ्यांकडे युरोपिय देश पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. पुढच्या काळात झॅपोरिझिआच्या या प्रकल्पात आण्विक दुर्घटना घडलीच, तर आम्हाला हे अपेक्षित नव्हते, असे कारण युक्रेनकडून दिले जाऊ शकते. मात्र युरोपिय देशांमध्येही अणुऊर्जा प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांमध्येही आण्विक दुर्घटना घडू शकते, अशा खरमरीत शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी युरोपिय देशांना खडसावले आहे.

झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्प असुरक्षित बनविणार असाल, तर युरोपिय देशांमधील अणुप्रकल्पांचीही तशीत गत करू, हा इशारा रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिल्याचे दिसत आहे. तसेच झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावर हल्ला चढवून इथून किरणोत्सर्ग झालाच, तर त्याचे खापर रशियावर फोडण्याचा पाश्चिमात्यांचा डाव असल्याची जोरदार चर्चा रशियामध्ये सुरू झाली आहे. रशियन संसदेचे सदस्य ही बाब वारंवार लक्षात आणून देत आहेत. अशा परिस्थिती माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी युरोपिय देशांमध्येही ‘आण्विक दुर्घटना होईल’ हा दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढविला असून यामुळे युक्रेनी लष्कराच्या क्षमतेत वाढ झाल्याचा दावा केला जातो. युक्रेनी लष्कराने रशियन सैन्यावर घातक हल्ले चढवून त्यात रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे दावे ठोकले आहेत. मात्र सध्या तरी राजनैतिक पातळीवर रशिया झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावरून युक्रेन-अमेरिकेसह युरोपिय देशांना गंभीर इशारे देत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग रशियाचे हे इशारे गंभीरपणे घेत असून झॅपोरिझिआतील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करीत आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाहणीसाठी अणुऊर्जा आयोगाने दिलेला प्रस्ताव रशियाने धुडकावून लावला आहे.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info