‘हवाना सिंड्रोम’च्या परिणामांसाठी रशियाने तयार रहावे – अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘जगभरातील दोनशेहून अधिक अमेरिकी जवानांना बाधा करणार्‍या गूढ ‘हवाना सिंड्रोम’मागे रशिया असल्याचे उघड झाल्यास रशियाने त्यापुढील कारवाईसाठी सज्ज रहावे’, असा इशारा अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिला. तर या संपूर्ण प्रकरणाचा रशियाचा काहीही संबंध नसल्याचे सांगून रशियाने अमेरिकेचे आरोप फेटाळले आहेत.

‘हवाना सिंड्रोम’

२०१६ साली क्युबाच्या राजधानीत अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासातील कर्मचारी ‘हवाना सिंड्रोम’ने बाधित झाल्याचे समोर आले होते. यामध्ये सीआयएच्या एजंट्सचा समावेश असल्याचे उघड झाल्यानंतर हा एक जैविक हल्ला असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. यामागे क्युबा तसेच चीन असल्याची टीका ट्रम्प प्रशासनाने केली होती. यानंतर २०१७ साली वॉशिंग्टनसह युरोप व चीनमधील अमेरिकी दूतावासातील लष्करी तसेच गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी बाधित झाले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या अस्पष्ट आरोग्यविषयक घटना असल्याचे म्हटले होते. तर आपल्या एजंट्सच्या मानसिक व शारीरिक प्रकृतीवर आघात करणारे हे हल्ले जैविक हल्ल्याचा भाग असल्याचा आरोप सीआयएने केला होता. २०२० साली प्रसिद्ध झालेल्या अहवालात हवाना सिंड्रोममागे मायक्रोवेव्ह एनर्जीचा हल्ला असल्याचा दावा करण्यात आला होता. हा पूर्णपणे मानवनिर्मित हल्ला असल्याचे बोलले जात होते.

‘हवाना सिंड्रोम’

बायडेन प्रशासनाने अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्याचबरोबर अमेरिकी एजंट्सवर झालेल्या या हल्ल्यांमागे रशिया असल्याचे आरोप सुरू ठेवले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बर्न्स यांनी रशियाचा दौरा करून रशियन गुप्तचर यंत्रणेच्या दोन प्रमुख अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळीही हवाना सिंड्रोम चर्चेचा मुद्दा होता, असा दावा केला जातो.

या बैठकीत बर्न्स यांनी रशियाला इशारा दिल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांनी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. या हल्ल्यामागे जर रशिया असल्याचे आढळल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे सीआयएच्या प्रमुखांनी धमकावल्याची माहिती या अधिकार्‍यांनी दिली. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा ‘एफबीआय’च्या एजंट देखील हवाना सिंड्रोमने बाधित झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सीआयएच्या प्रमुखांनी रशियाला हा इशारा दिल्याचा दावा केला जातो. पण बर्न्स यांनी धमकीमध्ये ‘जर’चा वापर केल्यामुळे अजूनही अमेरिका रशियाच्या सहभागाविषयी गोंधळलेला असल्याचे दिसत आहे, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info