रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह आणि डोनेत्स्कमधील हल्ल्यांची व्याप्ती वाढविली

- क्रिमिआ व बेलगोरोदमधील रशियन तळांवर मोठे स्फोट

हल्ल्यांची व्याप्ती

मॉस्को/किव्ह – झॅपोरिझिआ अणुप्रकल्पांवरील हल्ल्याचा मुद्दा चिघळत असतानाच रशियाने खार्किव्ह व डोनेत्स्क प्रांतातील हल्ल्यांची व्याप्ती वाढविली आहे. बुधवार व गुरुवार असे सलग दोन दिवस खार्किव्ह प्रांतात केलेल्या क्षेपणास्त्रहल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली. तर डोनेत्स्क प्रांतातील बाखमत, स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क या सर्व आघाड्यांवर रशियन लष्कर तोफा, रणगाडे व रॉकेट्सच्या सहाय्याने सातत्याने मारा करीत आहे. दरम्यान, रशियाच्या बेलगोरोद तसेच क्रिमिआ प्रांतात नवे स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण युक्रेनच्या झॅपोरिझिआ प्रांतातील अणुप्रकल्पाचा मुद्दा चिघळत चालला आहे. युक्रेनकडून या प्रकल्पाचा परिसरात सातत्याने हल्ले होत असल्याचे आरोप रशियाने केले आहेत. तर रशियाच खोटे हल्ले घडवून ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’चा प्रयत्न करीत असल्याचा दावा युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी केला आहे. या मुद्यावरून वातावरण तापले असतानाच इतर भागातील संघर्षाची तीव्रताही वाढत असल्याचे दिसते.

हल्ल्यांची व्याप्ती

बुधवार व गुरुवार असे सलग दोन दिवस रशियाने ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांताला लक्ष्य केले. यासाठी क्षेपणास्त्रांसह हवाई हल्ले, तोफा तसेच रॉकेट्सचा वापर करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेला सुरुवात केल्यानंतर आरंभीच्या काळात खार्किव्हवर ताबा मिळविला होता. मात्र नंतर युक्रेनने हा भाग ताब्यात घेतला होता. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात रशियाने आपली कारवाई डोन्बास व दक्षिण युक्रेनमध्ये केंद्रित केली होती. मात्र लुहान्स्कच्या ताब्यानंतर रशियाने आपल्या लष्करी उद्दिष्टांची फेररचना केली असून खार्किव्हवरील नियंत्रणासाठी पुन्हा हल्ले सुरू केले आहेत.

डोन्बासमधील लुहान्स्क प्रांत ताब्यात घेतल्यानंतर रशियाला या क्षेत्रात मोठे यश मिळालेले नाही. त्यामुळे रशियाने आपली मोहीम अधिकाधिक तीव्र करण्यावर भर दिला असून त्यासाठी नवी तैनातही केल्याचे सांगण्यात येते. गेले काही दिवस रशिया सातत्याने डोन्बासमधील स्लोव्हियान्स्क, बाखमत, ॲव्हडिविका भागांमध्ये तोफा तसेच रॉकेट्सचा मारा करीत आहे. या भागातील काही गावे रशियाच्या नियंत्रणाखाली आली असली तरी निर्णायक भागांमध्ये युक्रेनकडून तिखट प्रतिकार होत असल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनकडून रशियन हद्दीत होणारे हल्लेही वाढत चालल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात युक्रेनी फौजांनी खेर्सन व झॅपोरिझिआमधील रशियन नियंत्रणाखाली असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ल्यांची मोहीम हाती घेतली होती. मात्र आता थेट रशियन हद्दीतील प्रांतांना लक्ष्य करण्यात येत आहे. युक्रेन सीमेला लागून असलेल्या बेलगोरोद तसेच रशियन ताब्यातील क्रिमिआवर हल्ले करण्यात येत आहेत.

खार्किव्ह

गुरुवारी संध्याकाळी बेलगोरोद प्रांतातील तिमोनोव्हो भागात असणाऱ्या रशियाच्या शस्त्रसाठ्याला मोठी आग लागली. यावेळी स्फोटांचे मोठे आवाजही आले असून जवळची दोन गावे रिकामी करण्यात आली आहेत. तिमोनोव्हो युक्रेनच्या सीमेपासून ३० मैलांच्या अंतरावर आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारी क्रिमिआमधील बेलबेक हवाईतळाजवळ चार मोठे स्फोटांचे आवाज आल्याचे सांगण्यात येते. गेल्या तीन आठवड्यात क्रिमिआ प्रांतातील तळावर हल्ला होण्याची ही तिसरी घटना ठरते. शुक्रवारच्या स्फोटांमध्ये कोणतेही नुकसान न झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला.

दरम्यान, रशियाने युरोपमधील तळ असणाऱ्या कॅलिनिनग्रॅडमध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची नवी तैनाती केली आहे. ‘किन्झाल’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसह रशियाची ‘मिग-३१आय’ ही लढाऊ विमाने गुरुवारी कॅलिनिनग्रॅडमधील तळावर दाखल झाली. ही विमाने व क्षेपणास्त्रे ‘राऊंड द क्लॉक कॉम्बॅट ड्यूटी’साठी तैनात करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. किन्झालचा पल्ला दोन हजार किलोमीटर्सचा असून त्याचा वेग ‘मॅक-१२’ अर्थात ध्वनीच्या १२ पट इतका आहे. तर रशियाने ब्लॅक सी सागरी क्षेत्रात, कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या तीन ‘क्रूझ कॅरिअर्स’ तैनात केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info